सातारा : गेली 8 वर्षे रखडलेल्या पोलिस वसाहतीचे काम झाले असतानाही तांत्रिक कारणामुळे ती पोलिसांना मिळत नव्हती. दैनिक ‘पुढारी’ने याबाबत 19 सप्टेंबर रोजी ‘पोलिस वसाहतीला लालफितीच्या बेड्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करुन झाडाझडती घेतल्यानंतर प्रशासन हलले. अखेर ही वसाहत आता पोलिसांना खुली करण्यात आली असून तसे वाटप देखील पूर्ण झाले आहे. दरम्यान, लवकरच पोलिसांना वसाहतीचा ताबा दिला जाणार आहे.
सातारा पोलिस मुख्यालयापाठीमागे भव्यदिव्य अशी पोलिस वसाहत उभी राहिली आहे. यामध्ये एकूण 698 सरकारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी यांना ही निवासस्थाने आहेत. गेली 8 वर्षे या इमारतीचे काम सुरु होते. कोरोनामुळे इमारत बांधण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. गेली दोन वर्षे इमारत बांधून पूर्ण झाली असतानाही लालफितीत कारभार अडकला होता.
भोगवटा प्रमाणपत्र व एमएसईबीची लाईट यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष फ्लॅटचा ताबा मिळण्यास विलंब होत होता. गेल्या 8 वर्षापासून साताऱ्यातील बहुसंख्य पोलिस वसाहतीविना राहत होते. फ्लॅटचे भाडे अव्वाच्यासव्वा असल्याने पोलिसांना भुर्दंड होत होता. दुसरीकडे अडगळीस आलेल्या पोलिस वसाहतीमध्ये काही पोलिस कुटुंबिय जीव मुठीत धरुन वास्तव्य करत होते. पोलिसांची ही सर्व होत असलेली हेळसांड दैनिक ‘पुढारी’ने याबाबत 19 सप्टेंबर रोजी सचित्र ‘पोलिस वसाहतीला लालफितीच्या बेड्या’ या मथळ्याखाली प्रसिध्द केली.
अखेर याची दखल घेत 10 दिवसांपूर्वी पोलिसांना अर्ज करायला लावून लॉटरी पध्दतीने फ्लॅट मंजूर करण्यात आले. फ्लॅटमध्ये वास्तव्य करताना नियमावली राबवली जाणार आहे. त्या अनुषंगानेही नुकतीच बैठक झाली आहे. येत्या काही दिवसातच पोलिस मुख्यालय पाठीमागील पोलिस वसाहत खुली होणार आहे. यामुळे पोलिसांसह कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.