कराड : कराड शहरातील वाहतूक नियमन प्रभावीपणे राबविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य उपकरणांचा वापर रोखण्यासाठी कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज दिवसभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ब्लॅक फिल्मिंग, मॉडिफाईड सायलेन्सर, प्रेशर हॉर्न व फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ वाहनांवरील ब्लॅक फिल्म काढण्यात आली. तसेच ३ मॉडिफाईड सायलेन्सर,७ फॅन्सी नंबर प्लेट आणि ३ प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले.
दरम्यान, रात्रीच्या वेळी कोल्हापूर नाका, कार्वे नाका आणि कृष्णा कॅनॉल या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमध्ये मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ड्रिंक अँड ड्राईव्हच्या ७ केसेस नोंदविण्यात आल्या. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ६ केसेस करण्यात आल्या. सदरची कारवाई निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक राजश्री पाटील कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जगदाळे व राजेंद्र घाडगे, पोलीस हवालदार अमोल पवार, सत्यजीत नेवसे, संदिप घोरपडे, जयवंत गोसावी, अश्विनी सूर्यवंशी, तृप्ती वीर तसेच पोलीस शिपाई प्रशांत मोहिते आणि शिवनंदन नारायणी, मधुरकर यांनी सहभाग घेतला.