पिंपोडे बु. : दिवाळीच्या प्रारंभीच वाठार पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दोघा संशयितांना अटक केली आहे. पिंपोडे खुर्द येथील राहत्या घरातून चोरीस गेलेली दोन तोळे वजनाची आणि २ लाख ८५ हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ पोलिसांनी हस्तगत केली.
प्रशांत हिंमत जगताप (वय ३२, रा. वडगाव, ता. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात ते २६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ या कालावधीत राहत्या घरातून दोन तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ चोरीस गेली होती. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी सूचना दिल्या. त्यानुसार संशयितांना जेरबंद करण्यात आले.
संशयितांकडून चोरीस गेलेली संपूर्ण सोन्याची मोहनमाळ हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलिस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलिस हवालदार उदय जाधव, धीरज यादव, जितेंद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रतीक देशमुख आणि एकनाथ सरगर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार धीरज यादव करत आहेत.