पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपनीची गॅस एजन्सी तात्पुरत्या स्वरूपात स्थानबद्ध करण्यात आली आहे. गेले काही दिवस या एजन्सीच्या गैर कारभाराबाबत ग्राहकांच्या तक्रारी सुरू होत्या. त्यामुळे पुरवठा विभागाकडून ही गॅस एजन्सी तात्पुरत्या स्वरूपात स्थानबद्ध करण्यात आली. मात्र, त्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होणार असून त्यावर प्रशासन काय तोडगा काढणार? याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या काही वर्षापासून पिंपोडे बुद्रुक येथील रघुवीर स्वामी समर्थ ग्रामीण गॅस वितरक या एजन्सीकडून परिसरातील गावातील ग्राहकांना सेवा दिली जाते. स्थानिक पातळीवर सेवा मिळू लागल्यामुळे ग्राहक समाधानी होते. मात्र, गेल्या दीड दोन वर्षापासून एजन्सी चालक आणि कर्मचारी यांच्या गैर कारभारामुळे ग्राहकांना वेळेत डिलिव्हरी मिळत नव्हती. अनेकदा चालकाच्या अनागोंदी कारभारामुळे कंपनीकडून ही वेळेत पुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करत होते. मात्र गावात, गावाजवळ सोय असल्यामुळे जाहीरपणे कुणी तक्रारी करण्यास धजावत नव्हते.
युध्दजन्य परिस्थितीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्राहकांना दोन-दोन महिने गॅस मिळाले नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एजन्सी चालक मात्र खुशाल काळाबाजार करून पैसा कमवत असल्याचे चित्र होते. अखेर पुरवठा विभागाने तक्रारींची दखल घेत पिंपोडे बुद्रुक येथील रघुवीर स्वामी समर्थ ग्रामीण गॅस वितरक यांचा परवाना व पुरवठा तात्पुरता गोठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या सहा दिवसांपासून ग्राहकांना गॅस डिलिव्हर झालेले नाहीत. अशातच पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. कारवाईचे स्वागत असले तरी ग्राहकांची गैरसोय होवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
डिलिव्हरी मॅसेज येवून मिळेना गॅस
पिंपोडे येथील अनेक ग्राहकांना पाच एप्रिल पासून सिलेंडर पुरवठा झालेला नाही. ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांना ओटीपी आले, कॅश मेमोचे मेसेज आले आहेत कहर म्हणजे गॅस सिलेंडर डिलिव्हरी झाल्याचे सुद्धा मेसेज आले आहेत. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना सिलेंडर मिळालेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी ग्राहक करत आहेत.
पिंपोडे बुद्रुक येथील गॅस एजन्सीच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्याबाबत कंपनीकडे योग्य त्या कार्यवाही साठी संबंधित तक्रारी पाठवून दिल्या होत्या. त्यावर काय कारवाई झाली याबाबत माहिती घेत आहे.- वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी