फलटण : शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरील आठवडा बाजार परिसरात पालिकेने नुकताच उभारलेला पथदिव्याचा खांब रविवारी अचानक कोसळून दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर नव्याने उभारण्यात आलेल्या पथदिवा प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अनिल भोसले (रा. टाकळवाडे ता.फलटण) व वैशाली राजेंद्र राऊत (रा.विडणी, ता. फलटण) अशी जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. अनिल भोसले यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले असून वैशाली राऊत यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आठवडा बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या पालाची दोरी जवळील पथदिव्याच्या खांबाला बांधलीहोती. याचवेळी बाजारातून जात असलेल्या एका चारचाकी वाहनात ही दोरी अडकल्याने पथदिव्याचा खांब कोसळला. यामुळे पथदिव्याजवळ उभ्या असलेल्या दोन शेतकरी गंभीर जखमी झाले.
उपस्थितांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली व संदीप चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.