साखरवाडी : फलटण-दहिवडी मार्गावरील रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदारांकडून नियमित पाणी फवारणी केली जात नसल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना धुरळ्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून वाहनधारक व स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व खडी टाकण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी पाणी न मारल्याने वाहनांची ये-जा होताच मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. अनेकवेळा समोरून येणारी वाहने दिसेनाशी होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सकाळी व सायंकाळी कामगार, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. काही ठिकाणी इतका धूर उडतो की काही क्षण रस्ता धुक्यासारखा दिसू लागतो. दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत धूळ जात असून श्वसनाचे त्रासही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम होणे आवश्यक असले तरी कामादरम्यान सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. संबंधित ठेकेदारांनी दिवसातून किमान दोन वेळा पाणी फवारणी करावी तसेच धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात व वाहनधारकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.