सातारा

Satara: होळ येथील फलटण-बारामती मार्गावरील वाहतूक बंद

निरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने फलटण तालुक्यातील होळ येथील फलटण-बारामतीला जोडणारा पूल शुक्रवारी सायंकाळी पाण्याखाली गेला

पुढारी वृत्तसेवा

साखरवाडी : निरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने फलटण तालुक्यातील होळ येथील फलटण-बारामतीला जोडणारा पूल शुक्रवारी सायंकाळी पाण्याखाली गेला. पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वीर धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी होत असून, प्रशासनाने नदीपात्र व पुलाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, वीर धरण प्रशासनाने दुपारी ४ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून ६२,९२४ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,४०० क्युसेक असा एकूण ६३,३२३ क्युसेक विसर्ग निरा नदीपात्रात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर निरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, पूरग्रस्त पुलांवरून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT