Satara petrol diesel availability Pudhari
सातारा

Satara petrol diesel availability: जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा

वैशाली राजमाने : नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात पेट्रोल तसेच डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून इंधनसाठा मुबलक आहे. जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तिनही ऑईल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर यांनी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच इंधनाची साठेबाजी, काळाबाजार करताना सापडल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने म्हणाल्या, ॲडव्हान्स पेमेंट या सिस्टीममुळे काही पंपावर इंधन पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी व अनावश्यक साठवणूक करू नये. युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंधनाचा अनाधिकृत साठा करणे किंवा चढ्या दराने इंधन विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून अशा प्रकारची कोणतीही कृती करणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

अशाप्रकारे इंधन साठवणे हे सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन असून ते अत्यंत धोकादायक आहे. अशा परिस्थितीत जर एखादा पंपचालक बाटलीत इंधन देताना, साठेबाजी किंवा काळाबाजार करताना आढळल्यास, कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय संबंधित पंपचालक आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT