Satara fuel shortage Pudhari
सातारा

Satara fuel shortage: जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईचा भडका

कंपन्यांकडून इंधन पुरवठा बंद : पंपांवर वाहनचालकांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल व डिझेलची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने बुधवारी अनेक पंप बंद पडले. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी क्रेडिटऐवजी ॲडव्हान्स पेमेंटचे धोरण अवलंबल्याने या कंपन्यांचे पंप बंद पडले. पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, या भीतीने वाहनचालकांनी अनेक पंपांवर रांगा लावल्या. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हाहाकार माजल्याचे चित्र पहायला मिळाले.

जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या सरकारी कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पंप आहेत. पंपचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही पंपचालकांनी आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स) न भरल्याने कंपन्यांनी त्यांचा इंधन पुरवठा थांबवल्याचे सांगितले. तर दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांना कच्चे तेल खरेदीत तोटा होत असल्याने त्यांनी उत्पादन कमी केल्याची चर्चा आहे.

परिणामी, डिलर-सबडिलर्सना आज इंधन मिळणार नाही, पुरवठा उशिरा होईल किंवा चार दिवसांनी टँकर येईल अशी उत्तरे पेट्रोलियम कंपन्यांकडून देण्यात येत आहेत. असे असताना जिल्ह्यातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर परिस्थिती बरी असल्याने या कंपनीच्या पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांची एकच गर्दी उसळली. लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना इंधन भरून घेण्यासाठी तासन्‌‍तास प्रतीक्षा करावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT