सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या व नगरसेवक पदाच्या निवडणुकीत वातावरण सध्या बदलत असून सामान्य जनता 25 वर्षाच्या सत्तेला कंटाळली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी सातारा शहरातील मतदार उभे असल्याचे जाणवत असून यावेळी सातारा शहरात निश्चित बदल होणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुवर्णा पाटील उपस्थित होत्या.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा खा. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत सामान्य जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शहरातील निवडणूक ही निर्णायक टप्प्यावर आली आहे. साताऱ्यातील जनता गेल्या पंचवीस वर्षांच्या एकाधिकारशाही विरोधात एकवटली आहे. साताऱ्यातील सामान्य जनतेला आपलासा वाटणारा हक्काचा नगराध्यक्ष हवा आहे. त्यामुळे जनतेने येथील राजकीय दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवत असून या शहराला पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत.
सातारा शहरातील भ्रष्टाचार मुक्त आणि ठेकेदारीयुक्त कारभार बदलण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही काम करणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करू. सातारा शहरात प्रचारादरम्यान पदयात्रा व रॅलीत फिरताना लोकांचा प्रतिसाद मिळतोय ते पाहून येथील जनतेला खरोखरच आम्ही सक्षम पर्याय देऊ शकतो, असा विश्वास वाटतो, असेही आ. शिंदे म्हणाले.