Peacock Hunting Case 
सातारा

Peacock Hunting Case: मोराची शिकार करून मांस शिजवणारा ताब्यात

वर्ये येथील एकाला अटक : सापळा, सुरे, सत्तूरसह मोटारसायकल जप्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : मोराची शिकार करून त्याचे मांस शिजविल्याप्रकरणी सातारा वन विभागाने वर्ये, ता. सातारा येथील सागर गौतम पवार याला ताब्यात घेतले आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून मोराची पिसे, शिजविलेले मांस, मोराचे दोन पाय, शिकार करण्यासाठी वापरलेला सापळा, सुरे, सत्तूर, विळीचा लाकडी पाट, ताटली, मांस चिरण्यासाठी वापरलेली परात तसेच होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने सापळ्याच्या मदतीने मोराची शिकार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मोराचे मांस काढून ते शिजविण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून तेथील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी मोराची पिसे, दोन पातेल्यांमध्ये शिजविलेले मांस, मोराचे दोन पाय आढळून आले. याशिवाय मोर पकडण्यासाठी वापरलेला सापळा, तीन छोटे सुरे, एक मोठा सत्तूर, विळीचा लाकडी पाट, छोटी ताटली आणि मांस चिरण्यासाठी वापरलेली परात आढळली. वनगुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली शाईन मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. मोर हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षित वन्यप्राणी असून त्याची शिकार करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेले वन्यजीव अवशेष आणि मांस यांची आवश्यकतेनुसार वैद्यकीय तसेच वैज्ञानिक तपासणी करण्यात येत आहे. घटनास्थळ पंचनामा, जप्ती पंचनामा आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र सातारा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच वनपरिक्षेत्र फिरते पथक, सातारा यांच्या संयुक्त पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT