सातारा : भारताने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानची नांगी ठेचली. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 27 पर्यटक मारले गेले होते. या हल्ल्याचा भारतीय लष्कराने सडेतोड बदला घेतला. या घटनेनंतर सातारकरांच्या देशप्रेमाचे दर्शन होत आहे. याचा आनंदोत्सव सातारा जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. गुरुवारी (दि.८) राष्ट्रप्रेमी भारतीयांच्यावतीने शहरात तिरंगा रॅली काढून आनंद व्यक्त केला.
राजवाडा ते मोती चौक, कर्मवीर पथावरुन ही रॅली पोवई नाका येथे गेली. या ठिकाणी फटाक्यांचा वर्षाव करून शिवतीर्थाला फेरी मारून राजपथावरुन राजवाडा येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये ‘भारत माता की जय’च्या गर्जना करण्यात आली. ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करून नऊ तळ उद्ध्वस्त केले होते.
भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, म्हणूनच सातारकरांच्या मनात असलेली देशाबद्दल व सैन्याबद्दल भावना आणखीन सुदृढ करण्यासाठी ही तिरंगा बाईक रॅली काढल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान, सैन्यदल यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे सैन्य दलाचे मनोबल वाढावे आणि त्यांनी अजून, आत घुसून पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.