leopard terror  Pudhari
सातारा

Satara Leopard Terror : कुत्र्यांपासून मुक्‍ती, पण बिबट्यांची भीती

पाटण तालुक्यात प्रशासनाला जमलं नाही ते बिबट्याने करून दाखवलं, आता बंदोबस्‍ताची मागणी

पुढारी वृत्तसेवा
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : पाटण शहरासह तालुक्यातही फार मोठ्या प्रमाणावर गावठी कुत्र्यांचा हैदोस माजला असताना याबाबत स्थानिक ग्रामपंचायत, नगर पंचायतींना मोठ्या प्रमाणावर तक्रारी, निवेदने देऊन त्याचा काडीमात्र फायदा झाला नाही. नगरपंचायतीने तर कुत्र्यांची नसबंदी पकडापकडी बाबत जाहिरातींवर भरमसाठ खर्च केला तरी त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासन अथवा नागरिकांना जमलं नाही ती जनसामान्यांची भीती आता बिबट्यांनी जवळपास दूर केली असून शहरासह गावातील गावठी कुत्र्यांचा त्रास या बिबट्यांनी संपवला आहे.

एका बाजूला या गावठी कुत्र्याची भीती संपली असताना दुसरीकडे मात्र तालुक्यासह शहरातील मुख्य लोकवस्त्यांत बिबट्यांची वाढती संख्या धोका व भीतीदायक ठरत आहे. गावठी कुत्र्यांपासून मुक्ती मिळाली असली तरी बिबट्यांची दहशतीबाबत वन व वन्यजीव विभागाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी होत आहे.

पाटण तालुक्यात वर्षानुवर्षे वन्य प्राण्यांचा त्रास स्थानिकांना सहन करावाच लागत आहे, डोंगरपठारं, ग्रामीण विभागात बिबट्यांचा सातत्याने वावर सुरु आहे. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांसह मानवी हल्ले होत असताना वन अथवा वन्यजीव विभाग हातावर हात ठेवून केवळ बघ्याची भूमिका घेत असताना अनेकदा पहायला मिळतो. एका बाजूला बिबट्यांचा त्रास तर दुसरीकडे गावठी कुत्र्यांच्या कळपांनी स्थानिकांना हैराण करून सोडलेले असते यामुळे स्थानिकांचा जीव मेटाकुटीला आल्यावर शहरात गावठी कुत्र्यांनी छळलयं तर खेड्यात बिबट्यांनी पिडलयं अशीच अवस्था अनुभवायला मिळते.

पाटण तालुक्याला जंगलं, वन्य प्राण्यांचे त्रास नवीन नाही, येथे रानडुकरे, रानगवे, बिबट्या आदी वन्य प्राण्यांचा सातत्याने त्रास सहन करावाच लागतो. गेल्या काही वर्षांपासून या त्रासामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सर्वसामान्यांसाठी उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या शेती पिकांचे याच वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका बाजूला शेती पिकांचे नुकसान त्याचवेळी अनेक ठिकाणी पाळीव दूध देणारी जनावरेही या वन्य प्राण्यांनी फस्त केली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाटण तालुक्यातच नव्हे तर थेट तालुक्याचे ठिकाण असलेल्या पाटण शहरातही अनेक ठिकाणी बिबट्याचा राजरोसपणे वावर सुरू झाला आहे. यामुळे शहर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुसरीकडे शहर व ग्रामीण विभागातही गावठी कुत्र्यांच्या कळपांनी हैदोस मांडला होता पण तो या बिबट्यांमुळे बर्‍याच प्रमाणावर आता कमी झाला आहे. त्यामुळे रस्त्यांवरून मोठ्या व्यक्तींनाच नव्हे तर अगदी छोट्या मुलांना, विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास काहिसा सुखकर झाला आहे. वन्य प्राण्यांबाबतचे अनेक कायदे कठोर झाले त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा करणे हा गुन्हा ठरत आहे. मात्र त्याच प्राण्यांकडून होणारे मानवी हल्ले व नुकसानी बाबत शासन कोणत्याही ठोस उपाययोजना करत नसल्याने याबाबत स्थानिकांच्या प्रचंड संतप्त प्रतिक्रिया आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT