पाटण : पाटण ते संगमनगर (धक्का) कोयना या रस्त्याची झालेली दुर्दशा या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीने ’कोयना जगण्यासाठी निसर्ग आणि मरणासाठी रस्ता’ या मथळ्याखाली मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदार कंपनीकडून तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
गुहागर - विजापूर महामार्गावरील कराड - चिपळूण या दरम्यान पाटण ते संगमनगर (धक्का) या दरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. प्रामुख्याने पाटण ते संगमनगर या रस्त्यावर सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे काढण्यात आले असून अतिशय धोकादायक परिस्थितीत तेथून वाहनं व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सातत्याने येथे अपघात घडतात.
मात्र याबाबत आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. याशिवाय ज्या पद्धतीने कामाची गती आवश्यक आहे, त्या गतीने काम होत नसल्याच्या तक्रारी स्थानिकांसह वाहन चालकांनी मांडल्या असून या समस्यांना दैनिक पुढारीने वाचा फोडली आहे. या सर्व बाबींची महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून मंगळवारी याच रस्त्यावर बहुतांशी ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या असल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.
या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. मार्गावर असलेली अतिक्रमणे त्वरित काढावीत, महामार्गावरील राडारोडा प्राधान्याने काढावा, खड्डे तातडीने बुजवावेत, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. तसेच रस्त्याच्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या असतील, तर त्या तातडीने भरून घ्याव्यात असे सांगत ही सर्व कामे आठ दिवसात पूर्ण करावीत, अशा सूचनाही संबंधितांना दिल्या असल्याची माहिती अनंत गुरव यांनी दिली.