सातारा

Satara crime: पॅरोलवरील फरार आरोपीला बेड्या

पॅरोल रजेसाठी बाहेर आल्‍यानंतर आरोपी कारागृहात हजर न होता पसार झाला होता

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे सातार्‍यातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्‍मठेपेची शिक्षा भोगत असलेला मात्र पॅरोल रजेवरून कारागृहात हजर न झालेल्‍या आरोपीला स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) पकडून बेड्या ठोकल्‍या. पॅरोल रजेसाठी बाहेर आल्‍यानंतर आरोपी कारागृहात हजर न होता पसार झाला होता. आरोपी वेश करून सातार्‍यात वावरत असताना एलसीबीने शाहूपुरी येथे ही कारवाई केली.

भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहोर कॉलनी, शाहूपुरी) असे ताब्यात घेतलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भरत ओसवाल हा पत्‍नीच्या खुनातील आरोपी असून सातार्‍यातील गाजलेले हे प्रकरण आहे. खुनाच्या प्रकरणात भरत ओसवाल याला जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्‍हापूर येथील कळंबा कारागृहात तो शिक्षा भोगत होता; मात्र पॅरोल रजेवर तो ४५ दिवसांसाठी बाहेर आला. सहा वर्षांपूर्वी तो बाहेर आल्‍यानंतर कोरोना काळात त्‍याची पॅरोल रजा वाढवण्यात आली. २०२२ मध्ये कळंबा कारागृहात हजर राहणे अपेक्षित होते; मात्र तो हजर राहिला नाही. अनधिकृतरीत्‍या तो खुलेआम बाहेर फिरत होता. यामुळे कळंबा कारागृहाने तो पसार असल्‍याचे घोषित करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्‍याच्या विरुद्ध तसा गुन्‍हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी कारागृहातून संचित, अभिवचन रजेवर गेलेले बंदी नियत दिनांकास हजर न होता अनाधिकृतरीत्या कारागृहाबाहेर राहतात. ते लपून बसतात. अशा आरोपींना मध्यवर्ती कारागृहात जमा करण्याबाबतचे आदेश एलसीबीचे पो.नि. विश्वजित घोडके यांना दिले होते. त्‍यानुसार एलसीबीचे पथक आरोपीचा शोध घेत होते. पोलिस गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून शोध घेत होते; मात्र तो सापडत नव्‍हता. यामुळे पसार आरोपीस पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पो.नि. विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, रोहित निकम, महेश निर्मळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

वेशांतर करायचा...

सातारा एलसीबीने जंगजंग पछाडल्‍यानंतर भरत ओसवाल याची हरतर्‍हेची माहिती घेण्यात आली. तो ओळख लपवून, वेशांतर करून वारंवार ठिकाण बदलत होता. तपास पथकाने सर्वप्रथम आरोपीच्या जुन्या संपर्कांचे विश्लेषण सुरू केले. नातेवाईक व मित्रांकडून मिळणाऱ्या गुप्त माहितीकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. दरम्यान, तो अधूनमधून वेगवेगळ्या ठिकाणांहून आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधत असल्याचे तपास पथकाच्या लक्षात आल्याने पोलिस त्याच्या मागावर असतानाच तो सापडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT