Satara News | परळी खोर्‍यात ओला दुष्काळसद़ृश स्थिती File Photo
सातारा

Satara News | परळी खोर्‍यात ओला दुष्काळसद़ृश स्थिती

पावसाच्या हाहाकाराने शेतीचे अतोनात नुकसान; शेतकरी वर्ग चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

परळी : सातारा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्‍या परळी, ठोसेघर परिसरात मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केली. आजअखेर या भागात पाऊस पडत असल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाचे पीक मिळणे अवघड झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

रळी खोरे आणि पाऊस हे जणू समीकरण झाले आहे. याठिकाणी गेले दोन महिने वारंवार पाऊस पडत आहे. जिल्हयाच्या इतर भागात जरी पावसाने उघडीप दिली असली तरी याभागात पाऊस सुरुच आहे. शेतात पाय टाकला तरीही पाय रुतत आहे. अशा परिस्थितीत पेरणीसाठी घात नसल्याने पेरणी कशी करणार? अशी परिस्थिती झाल्याने या परिसरातील पेरण्या लांबल्या आहेत तर यावर्षीचा खरीप पिकाचा हंगामच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, भुईमूग ही पिके तर पूर्ण बुडाली आहेत. भाताची रोपे पेरली आहेत मात्र ऊन नसल्यामुळे ही रोपे पिवळी पडून कुजली आहेत. कारी, रायघर, आंबळे, ठोसेघर, चाळकेवाडी, रेवंडे, वावदरे, पांगारे, पळसावडे, केळवली, सांडवली, करंजे, लावंघर अशा सुमारे 50 ते 60 गावांमधून शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाणी करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.

यावर्षी संततधार पावसामुळे पेरण्याच झाल्या नाहीत. त्यामुळे निकष न पाहता महसूल कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाणी करून शासनाकडे तातडीने अहवाल पाठवून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

या परिसरातील लघुपाटबंधारेचे तलाव ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगरदर्‍यातील पाणी शेतात जाऊन शेतीचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जमिनी खचल्या आहेत. काहींच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. मात्र, त्यांचे पंचनामे झाले नाहीत, अशाही तक्रारी समोर येत आहेत. या हंगामात कडधान्य भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकर्‍यांनी भाताचे तरवे टाकले पण रोपे उगवली नाहीत, तर काहींची उगवलेली रोपे कुजून गेल्याने भात शेती पडून राहिल, अशी भीती आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, लोकप्रतिनिधी यांनी शेताच्या बांधावर यावे. शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी परळी भागातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT