pudhari photo
सातारा

Satara: पाचगणीत वीजपुरवठा खंडित ; इंटरनेट सेवा ठप्प

नागरिक, पर्यटक व व्यावसायिकांची गैरसोय : कंपन्‍यांच्‍या कारभारावर संताप

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : पाचगणी शहरासह परिसरात वीज खंडित झाल्यामुळे मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे कोलमडली. दूरध्वनी व इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांना पूर्ण दिवस गैरसोयीला सामोरे जावे लागले. शहरात वीजपुरवठा खंडित होताच प्रमुख मोबाईल सेवा कंपनी असलेल्या जिओ कंपनी चे नेटवर्क पूर्णपणे कोलमडल्याने दूरसंचार व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. यामुळे संताप व्‍यक्‍त करण्‍यात आला.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल नेटवर्क गायब झाल्याने पर्यटकांना हॉटेल, होमस्टे, पर्यटनस्थळे तसेच नातेवाईकांशी संपर्क साधणे कठीण झाले. अनेकांना ऑनलाइन बुकिंगची माहिती मिळाली नाही, तर काही पर्यटकांना डिजिटल नकाशे वापरता न आल्याने मार्ग शोधण्यातही अडचणी आल्या.

वीजपुरवठा बंद झाल्यानंतर काही वेळातच मोबाईल नेटवर्क गायब झाले. कॉल लागत नव्हते, इंटरनेट पूर्णपणे ठप्प झाले आणि अनेकांच्या मोबाईलवर 'नो सर्व्हिस' दिसू लागले. त्यामुळे नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्कच तुटला. आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा नातेवाईकांशी संपर्क साधणेही कठीण झाले.

नेटवर्क सेवा बंद पडल्याने हॉटेल बुकिंग, ऑनलाइन पेमेंट, जीपीएस, यूपीआय व्यवहार आणि इतर डिजिटल सुविधा ठप्प झाल्या. व्यापाऱ्यांना व्यवहार करता आले नाहीत.पावसाळ्यात वीज गेली की मोबाईल नेटवर्क गायब होणे ही नेहमीची बाब झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपन्यांकडून सक्षम बॅटरी बॅकअप किंवा जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांकडून नियमित बिल आकारले जात असताना सेवा मात्र निकृष्ट दर्जाची मिळत असल्‍याचा अनुभव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT