दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी पाचगणी फुलली 
सातारा

Satara Tourism| दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी पाचगणी फुलली

डॉ. आंबेडकर उद्यान ते बसस्थानक, भोसे खिंडीपर्यंत वाहनांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीत पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. गुजरात, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोल्हापूरसह विविध भागांतून पर्यटक कुटुंबासह दाखल होत असल्याने पाचगणी-महाबळेश्वर परिसर पर्यटनाने गजबजला आहे. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला असून सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

पाचगणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून बसस्थानक परिसरापर्यंत, तसेच अंजुमन बसथांब्यापासून भोसे खिंडीपर्यंत वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटकांची खासगी वाहने, स्थानिकांची वाहने आणि प्रवासी वाहतूक एकाच वेळी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. टेबल लँड, पारसी पॉइंट, सिडनी पॉइंट, बाजारपेठ यांसह प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. हॉटेल, रिसॉर्ट आणि खासगी निवासस्थानेही पर्यटकांनी फुलली आहेत. विशेषतः सकाळी पर्यटनस्थळांकडे जाताना आणि संध्याकाळी निवासस्थानी परतताना वाहतूक कोंडीचा त्रास अधिक जाणवत आहे. वाहनांच्या रांगांमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुख्य रस्त्यालगत असलेल्या हॉटेलच्या बाहेर पर्यटक वाहने उभी करत असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत आहे. परिणामी, इतर वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी पार्किंगसाठी जागा शोधताना वाहनचालकांचीही धावपळ होत आहे.

अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची गरज

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी प्रमुख चौकांत अधिक मनुष्यबळ तैनात करावे. रस्त्यालगतच्या अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT