Satara Politics 
सातारा

Satara Politics : जिल्ह्यात कौन-कौन बनेगा सभापती?

पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांची प्रतीक्षा : निवडींबाबत उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण शिंगटे

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्ह्यातील 11 पंचायत समितींच्या सभापती निवडीचे वेध लागले आहेत. या पंचायत समित्यांचे कारभारी कोण होणार, याबाबत ग्रामीण भागात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. सातारा, माण, जावली व वाई या पंचायत समितीचे सभापतिपद खुले असल्यामुळे येथील निवडी लक्षवेधक ठरणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितींच्या 130 सदस्यांची निवड झाली आहे. यानंतर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचे सभापती कोण होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपूर्वी पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापतींची निवड पूर्ण करणे आवश्यक असते. सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये एकहाती सत्ता आणण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. भाजपने सातारा, खटाव, कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसने खंडाळा, कोरेगाव, वाई तर शिवसेनेने पाटण पंचायत समितीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवली आहे. महाबळेश्वर, जावली, माण आणि फलटण पंचायत समितीमध्ये सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. जवळपास चार वर्षाच्या प्रशासक राजवटीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सातारा पंचायत समितीमधील 16 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा 10, राष्ट्रवादीचे 5 तर शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आला. सभापतीपदासाठी सर्वसाधारण खुला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. भाजपची सत्ता राहणार असल्याने लिंब गणातून प्रभाकर पवार, कोंडवे गणातून महेश गाडे, परळी गणातून वसंतराव भंडारे हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आले आहेत. खुल्या प्रवर्गातील 3 गण हक्काचे असले तरी राहूल शिंदे यांचीही या जागी वर्णी लागू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले कोणाली संधी देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

पाटण तालुक्यातील 14 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट 13 तर भाजपाचा 1 सदस्य निवडून आला. पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला खुला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी येराड गणातून विद्या शिंदे, मुरूड गणातून सविता पवार, मल्हारपेठ गणातून अर्चना पाटील, मारूल हवेली गणातून प्रियांका देसाई हे सदस्य सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आले आहेत. यामध्ये कोण सभापती होणार? याकडे लक्ष लागले आहे. कराड तालुक्यातील 24 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता पंचायत समितीवर मिळवली आहे. भाजपाचे 15, राष्ट्रवादीचे 4, शिवसेना 1, काँग्रेस 2 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 सदस्य निवडून आले आहेत. पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला खुला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. भाजपच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी वडोली भिकेश्वर गणातून कोमल यादव, वाघेरी गणातून अनिता वेताळ, विंग गणातून नंदाताई यादव, शेरे गणातून वर्षा निकम या निवडून आल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणाला सभापती म्हणून आ. अतुल भोसले संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

फलटण तालुक्यातील 16 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप 5, राष्ट्रवादीने 3 तर शिवसेना शिंदे गटाचे 8 सदस्य निवडून आले आहेत. या ठिकाणी सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. साखरवाडी पिंपळवाडी गणातून राष्ट्रवादीच्या शिवाजंली भोसले, सांगवी गणातून शिवसेनेच्या पुष्पा चोपडे निवडून आल्या आहेत. अधिकृतरित्या पदाच्या दावेदार या दोघींशिवाय दुधेबावी गणातून विजया सोनवलकर, बरड गणातून स्वाती आटोळे, वाठार निंबाळकर गणातून शुभांगी शिंदे याही दावेदार आहेत. पक्षीय पातळीवर राष्ट्रवादी 1, भाजपा 1, शिवसेनेच्या 3 सदस्यांपैकी कोणाची लॉटरी लागणार हे सभापती निवडीवेळीच कळणार आहे.

खंडाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या 6 गणांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीला 4 तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळालेला आहे. पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या पदांसाठी खेड बु. गणातून विजयी झालेल्या माजी सभापती रमेश धायगुडे यांच्या पत्नी वंदना धायगुडे तर शिरवळ गणातून निवडून आलेल्या छाया जाधव यांची नावे चर्चेत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील हे यामधील कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.

वाई तालुक्यातील पंचायत समितीच्या 8 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 5 तर भाजपाला 3 ठिकाणी यश मिळाले आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता राहणार असून सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासाठी अभेपुरी गणातून विक्रांत डोंगरे हे प्रबळ दावेदार असले तरी राष्ट्रवादीतूनच शेंदूरजणे गणाच्या वर्षा जगताप, पाचवड गणाच्या राणी पवार याही रेसमध्ये आहेत. या ठिकाणी ना. मकरंद पाटील जुन्या चेहऱ्यांना संधी देणार की राजकीय समतोल साधत नवीन निवडून आलेल्या महिलांना सभापती करणार याकडे लक्ष आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या 4 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी दोन दोन जागा मिळालेल्या आहेत. मात्र सभापती पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग हे असून या पदासाठी राष्ट्रवादीच्या मेटगुताड गणातून निवडून आलेल्या शकुंतला चोरमले यांनाच संधी मिळणार आहे.

कोरेगाव तालुक्यातील 12 पंचायत समितीच्या गणांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारत सर्वाधिक 9 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना 2 व भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. सभापतिपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ल्हासुर्णे गणातून रूपाली गुरव, वाठार किरोली गणातून निकिता गिरी या दोघींमध्येच रेस लागणार आहे. या ठिकाणी आ. शशिकांत शिंदे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे नजरा आहेत. माण तालुक्यातील 10 पंचायत समितीच्या गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 5 तर राष्ट्रवादीने 5 जागा जिंकल्या आहेत. सभापतिपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग हे आरक्षण आहे. या ठिकाणी भाजपचे मलवडी गणातून बाळकृष्ण कदम, आंधळी गणातून अर्जुन काळे, वावरहिरे गणातून राजाराम बोराटे तर राष्ट्रवादीच्या वरकुटे मलवडी गणातून विक्रम शिंगाडे हे निवडून आले आहेत. मात्र, या ठिकाणी मतदारांनी समसमान कौल दिल्याने सभापतिपदासाठी ईश्वर चिठ्ठीचा आधार घ्यावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

खटाव तालुक्यातील 14 पंचायत समितीच्या गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने 8 व राष्ट्रवादीने 6 जागा मिळवल्या आहेत. खटाव पंचायत समितीवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असून येथील सभापती पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षीत आहे. त्यामुळे यापदी कातरखटाव गणातून भाजपाकडून निवडून आलेल्या वनिता दुबळे यांची वर्णी लागणार आहे. जावली तालुक्यातील 6 पंचायत समितीच्या गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 3, शिवसेना शिंदे गटाने 2 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 1 जागी विजय मिळवला आहे. येथे मतदारांनी वेगवेगळा कौल दिल्याने पंचायत समितीच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. जावली पंचायत समिती सभापतिपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग हे आरक्षण असल्याने भाजपकडून निवडून आलेले खर्शी बारामुरे गणातील गोरख महाडिक, कुडाळ गणातील सौरभ शिंदे हे दावेदार आहेत. मात्र, सत्ता कोणाची येणार? यावर सभापतिपदाची गणिते अवलंबून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT