म्हसवड : दुचाकीवरून घरी निघालेल्या ज्वेलर व्यावसायिकाच्या मोटारसायकलला पाठीमागून कारने धडक देत त्याच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग जबरदस्तीने हिसकावून तिघांनी पलायन केले. पळसावडे (ता. माण) येथे घडलेल्या या घटनेत सहा लाख दहा हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
याप्रकरणी नवनाथ वसंत खुपकर (वय ३३, रा. पळसावडे, ता. माण) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. ४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खुपकर हे मोटारसायकलवरून (एमएच ११ बीपी २८३९) घरी जात होते. देवापूर-पळसावडे रस्त्यावर गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर तुकाराम बाबर यांच्या द्राक्षबागेजवळ पाठीमागून आलेल्या सिल्व्हर रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर खुपकर यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली.
त्याचवेळी कारच्या चालकाच्या बाजूला बसलेला सुमारे २५ ते २६ वर्षांचा, गोऱ्या रंगाचा, उभट चेहऱ्याचा आणि काळ्या रंगाची हुडी घातलेला तरुण कारमधून उतरला. त्याने खुपकर यांच्या पाठीवर अडकवलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर कारमधील तिघेही संशयित दागिन्यांसह पळसावडे-दिघंचीच्या दिशेने पसार झाले. बॅगेतील दागिन्यांची किंमत सहा लाख दहा हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि संदीप पोमण करत आहेत.