साखरवाडी : फलटण-लोणंद पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून, हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी निंभोरे गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. २९) सुरवडी गावच्या हद्दीत गोल्डन सिटी सहकारी सोसायटीसमोर दुचाकीच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
कृष्णाबाई उत्तमराव धनवडे (वय ७५, रा. निंभोरे, सध्या रा. गोल्डन सिटी) या महामार्ग ओलांडत असताना स्प्लेंडर दुचाकी (एमएच ११ बीसी ८४६९) ने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच सुरवडीचे पोलीस पाटील संतोष पवार आणि गोल्डन सिटीचे चेअरमन सचिन शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेतून त्यांना फलटण येथे उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पालखी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अवघ्या दोन दिवसांत दोन जणांचा बळी गेल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. महामार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित करणे, आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारणे, दिशादर्शक फलक लावणे तसेच पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून अपघातांची मालिका थांबवावी, अशी मागणी होत आहे.