सातारा : सातारा पालिकेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामकाजाऐवजी बाहेर उंडारत असल्याच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर यांनी घेतली. पदाधिकाऱ्यांनी विविध विभागांमध्ये अचानक धाड टाकल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या सरप्राईज व्हिजिटमुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ माजली. अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत गायब असल्याचे दिसून आले. काही कर्मचारी रजेचा अर्जही न देता गैरहजर राहिल्याचे उघडकीस आल्याने कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नगरसेवकांकडून गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेतील कामकाजाबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तसेच कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सापडत नसल्याच्या तक्रारी नगराध्यक्षांपर्यंत पोहोचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेच्या विविध विभागांमध्ये अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
नगराध्यक्षांनी पालिकेच्या विविध शाखांमध्ये जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून आले. काही कर्मचारी कार्यालयीन वेळेतच अनुपस्थित होते. विशेष म्हणजे अनेकांनी रजेचा अर्जही आस्थापना विभागाला दिला नसल्याचे समोर आले. त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा पूर्णपणे बोऱ्या वाजल्याचे स्पष्ट झाले. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीवेळी काही कर्मचारी उशिरा कार्यालयात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले. ठरलेल्या वेळेनंतर कार्यालयात येऊनही उपस्थिती नोंदवली जात असल्याचे प्रकारही समोर आले. काही ठिकाणी तर कर्मचारी बाहेर जाऊनही हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करत नसल्याचे आढळले. त्यामुळे कार्यालयीन शिस्त आणि नियंत्रण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
या संपूर्ण प्रकारामुळे पालिकेतील कार्यालय अधीक्षकांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रजा आणि हालचाल रजिस्टर ठेवण्याची जबाबदारी कार्यालयीन प्रशासनावर असते. मात्र अनेक कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असताना त्याची कोणतीही नोंद नसल्याने प्रशासनाची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अचानक झालेल्या या तपासणीमुळे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अक्षरश: धांदल उडाली. काही कर्मचारी घाईघाईने कार्यालयात दाखल होताना दिसले, तर काहींनी आपल्या अनुपस्थितीचे कारण देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्ष पाहणीमुळे समोर आलेल्या वास्तवामुळे पालिका प्रशासनातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नगराध्यक्षांनी पाहणीनंतर खातेप्रमुखांची बैठक घेऊन सुचना केल्या. ते म्हणाले, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. कार्यालयात अधिकारी व कर्मचारीच नसतील तर नागरिकांनी कोणाकडे जायचे? पालिकेच्या कामकाजात शिस्त आणि जबाबदारी आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेनुसार सकाळ ते दुपारपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे. साईट व्हिजीट दुपारनंतर कराव्यात. तातडीच्या कामासाठी बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी. यापुढे बेशिस्तपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्षांचे स्वीय सहायक श्रीकांत गोडसे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.