सातारा : ऊस उत्पादक शेतकर्यांची उसाची पंढरी समजल्या जाणार्या सातारा जिल्ह्यातील पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे काम सर्वोत्कृष्ट आहे. या संशोधन केंद्राकडून सुमारे 17 उसाचे वाण विकसित केले आहेत. विकसित केलेल्या उसाच्या वाणाखाली 56 टक्क्या इतके क्षेत्र आहे. तर महाराष्ट्रात 80 ते 85 टक्के क्षेत्र पाडेगावच्या ऊस वाणाने व्यापले आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या भरभराटीमध्ये व साखर कारखान्यांच्या प्रगतीमध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा सिंहाचा वाटा आहे.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. स्वातंत्र पूर्व काळात 1892 साली पुण्याजवळील मांजरी येथे ऊस संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यावेळी उसाचे अधिक उत्पादन आणि गुळाच्या चांगल्या प्रतिसाठी उसाच्या सुधारित लागवड पद्धती जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी संशोधन केले जात होते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाची व्यवस्था व साखर कारखान्यांची उभारणी झाल्यामुळे ऊस पिकांवर सर्वकष संशोधन होण्याची गरज भासू लागली. त्याअनुषंगाने सन 1932 साली मांजरी येथील संशोधन केंद्र स्थलांतरित करून पाडेगाव येथे या केंद्राची स्थापना झाली. उसाचे जास्त उत्पादन व साखरेचा जास्त उतारा देणार्या नवीन ऊस वाणाची पैदास करणे आणि अधिक ऊस उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे.
हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने नवनवीन उत्कृष्ट ऊस वाण निर्मितीची देदीप्यमान व उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या केंद्राला 94 वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्राने आजपर्यंत 17 वाण विकसित केले आहेत. शाश्वत व अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांना तंत्रज्ञानाच्या 110 मोलाच्या शिफारशी दिल्याची माहिती ऊस विशेषतज्ज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व डॉ. सूरज नलावडे यांनी दिली.
पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने को 419, को 740, को 7219 (संजीवनी), कोएम 7125 (संपदा), को 7527, कोएम 88121(कृष्णा), को 8014 (महालक्ष्मी), को 86032 (नीरा), को 94012 (फुले सावित्री), कोएम 0265 (फुले-265), को 92005 (फुले 92005), एमएस 10001 (फुले 10001), कोएम 09057 (फुले 09057), कोएम 11082, फुले ऊस 15012, फुले ऊस 13007, फुले ऊस 15006, असे अनेक सरस वाण विकसित केले आहेत.