gaur  
सातारा

Satara News: पाडळोशी, केळोली, वनवासवाडीत गव्यांचा मुक्त संचार

रानगव्यांचा मुक्त संचार,शेतकरी धास्‍तावले; सध्या खरीप हंगामातील पिकांच्या मशागती धोक्‍यात

पुढारी वृत्तसेवा

चाफळ : चाफळ विभागातील डोंगरमाथ्यावरील पाडळोशी, केळोली, वनवासवाडी व कोळेकरवाडी मुसळेवाडी, परिसरातील शिवारात गेल्या महिनाभरापासून रानगव्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी अक्षरशः धास्तावले आहेत. खरीप हंगामातील पिकांची भागलण, कोळपणी व मशागतीची कामे जोरात सुरू असताना शेतशिवारात कधी रानगवे समोर येतील, याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतात जावे तरी कसे आणि शेती करायची तरी कशी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

चाफळपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील या गावांच्या शिवारात गुरे राखण्यासाठी तसेच शेतीच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रानगव्यांचा मुक्त संचार वारंवार दिसून येत आहे. रानगव्यांचा कळप शेताजवळ किंवा शिवारात दिसताच शेतकरी आरडाओरड करून त्यांना डोंगराच्या दिशेने हाकलून देत आहेत. मात्र काही काळानंतर पुन्हा रानगवे शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीची अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. पिकांची भागलण, कोळपणी, तण काढणे तसेच पिकांची निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे लागत आहे. मात्र रानगव्यांच्या वावरामुळे शेतात काम करताना सतर्क राहावे लागत असून, अचानक समोर आलेल्या रानगव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होत आहे. रानगव्‍यांचा वनविभागाकडून बंदोबस्‍त करावा, अशी मागणी होत आहे.

वनविभाग नेमका करणार तरी काय?

गेल्या महिनाभरापासून रानगव्यांचा वावर सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असताना वनविभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. संबंधित वनकर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून रानगव्यांच्या वावराचा मागोवा घ्यावा, शेतकऱ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे आणि वन्यप्राण्यांचा शिवारातील वावर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांतून होत आहे.

आधी रानडुक्कर,आता रानगवे!

चाफळ परिसरातील शेतकरी आधीच रानडुकरांच्या त्रासाने हैराण आहेत. खरीप पिकांचे रानडुकरांकडून नुकसान होत असतानाच आता रानगव्यांचा शिवारातील वाढता वावर शेतकऱ्यांसाठी नवी डोकेदुखी ठरला आहे. मेहनत, खर्च आणि वेळ देऊन उभी केलेली पिके वन्यप्राण्यांपासून वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT