सातारा : शेतकऱ्यांच्या उसाला ४,५०० रुपये प्रतिटन दर मिळावा, या मागणीसाठी नागठाणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन दिवसांपासून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. दराचा निर्णय झाल्याशिवाय रस्त्यावरून न हटण्याच्या भूमिकेवर संघटना ठाम आहे. नागठाणे येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हजारो वाहनधारकांना बसला आहे. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, लिंबखिंडीपासून शिवराज पेट्रोल पंपापर्यंत कोल्हापूरच्या दिशेने वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी २४ तासांहून अधिक काळ कायम राहिल्याने महामार्गावर वाहनांचे पार्किंगच तयार झाले.
ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे ( ता. सातारा) येथे चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. ऊस दराबाबत प्रशासनाकडून तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. मागणीनुसार सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलनापासून न हटण्याच्या निर्णयावर शेतकरी संघटना ठाम राहिली आहे. संघटनेच्या या मागणीला शेतकर्यांकडून प्रतिसादही वाढू लागला आहे.
जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना उसासाठी प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिला हप्ता व ५०० रुपये दुसरा हप्ता द्यावा अशी शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी असून त्यासाठी शेतकरी संघटनांनी चक्का जाम सुरू केले आहे. दिवाळीनिमित्त गावी, कुटुंबीयांकडे जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची या कोंडीत मोठी गैरसोय झाली. अनेक कुटुंबांना वाहनांमध्येच बसून रात्र काढावी लागली. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल झाले. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि जेवणाची सोय नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची दिवाळी मात्र महामार्गावरील कोंडीतच अडकली.
कोंडीचा सर्वाधिक फटका मालवाहतूक करणाऱ्या ट्रक आणि टँकर चालकांना बसला. शेकडो मालवाहू वाहने तासन्तास एकाच जागी उभी असल्याने चालकांना जेवण, पाणी आणि दैनंदिन गरजांसाठीही वणवण करावी लागत आहे. काही चालकांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. वाहने पुढे सरकत नसल्याने मालवाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले असून, चालकांवर उपासमारीची वेळ आली. येथील कणसे हुंडाई, हॉटेल फर्न परिसरात बॅरिकेडिंग करून वाहने थांबवण्यात आली आहेत. नागठाणे येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आल्याने वाहनांच्या रांगा दूरपर्यंत पोहोचल्या आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी वाहने थांबलेली पाहायला मिळाली.
कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पुढे जाण्याचा मार्गच उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवाळीच्या सणासाठी घराकडे निघालेल्या प्रवाशांना महामार्गावरच रात्र काढावी लागत असेल, तर ही परिस्थिती प्रशासनाच्या वाहतूक नियोजनापुढेही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. महामार्गाची पुणेकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मार्गिका पूर्णत: बंद झाली; मात्र, पुण्याच्या दिशेने वाहने जाताना दिसत होती.