सातारा : सातारा शहरात ठिकठिकाणी हिरवी जाळी लावून खुले आम सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केले जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच कायद्याचा धूर निघू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध श्वसनविकार बळावू लागले आहेत. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सातारा शहर व परिसरात हिरव्या व अन्य रंगाच्या जाळ्या लावून उभारलेल्या शेडमध्ये जुगार, मटका, इतर अवैध धंद्याबरोबर धुम्रपानासारखे धंदे जोमात सुरु आहेत. अनेकदा या अवैध धंद्यांकडे पोलिस, आरोग्य विभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक कुटुंबे यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. सातारा शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी अशा हिरव्या रंगाच्या जाळ्या लावून शेड उभारली आहेत. या ठिकाणी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच नागरिक खुले आम सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धूर निघत आहे.
बिनदिक्कत वावरणाऱ्या ॲक्टिव्ह स्मोकर्समुळे पॅसिव्ह स्मोकिंगचा घातक विळखा परिसरात वावरणाऱ्या अबालवृद्धांना घेरु लागला आहे. तंबाखूमुळे निर्माण होणारा अत्यंत विषारी वायू धुम्रपान करणाऱ्या इतर नागरिकांद्वारे सोडल्या जाणारा धूर इतरांच्या फुफ्फुसात शिरत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. धुम्रपानामुळे कर्करोग होवू शकतो, अशी धोक्याची सूचना देणाऱ्या जाहिराती प्रसार माध्यमावरुन प्रसारीत केल्या जातात. सिगारेटच्या पाकीटावरसुध्दा तसा धोका अंकित केलेला असतो. धुम्रपानामुळे होणाऱ्या हानीबाबत जनजागृती करण्यासाठी शासनही पुढाकार घेते. मात्र प्रशासन याबाबतच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करीत नसल्याने सातारा शहरात स्मोकिंग झोन फोफावले आहेत.