बामणोली : कास तलावात बुडाल्याने सातारा शहरातील वनवासवाडी-अमरलक्ष्मी परिसरातील एकजण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. संग्राम हरिभाऊ भंडारे (वय 45) असे तलावात बुडून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम भंडारे हे दोन मित्रांसह कास परिसरात फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर तिघेही कास तलावाच्या परिसरात थांबले. त्यानंतर त्यांनी मद्यपान केले. त्यानंतर त्यापैकी दोघांना पोहण्याचा मोह झाल्याने ते तलावात उतरले, तर एक जण किनाऱ्यावरच थांबला होता. तलावात पोहत असताना संग्राम भंडारे यांना अचानक दम लागल्याने ते पाण्यात बुडाल्याचेे सोबतच्या दोघा मित्रांनी सांगितले.
मद्यप्राशन केल्यामुळे त्यांना पोहण्यात अडचण निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले; मात्र ते बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून शोधमोहीम सुरू केली आहे. कास बोट क्लबचे कर्मचारी तसेच कास येथील ग्रामस्थही शोधकार्यात सहभागी झाले आहेत. मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास हवालदार भिसे करत आहेत.