सातारा

Satara News : वृद्धाचा मृतदेह ठेवला सावकाराच्या दारात

मांडवे येथे तणाव : पोलिसांचा हस्तक्षेप; जमीन लिहून घेतल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

वडूज : मांडवे येथील पोपट रोहिदास बोबडे या वृद्धाचा महागाव येथील वृद्धाश्रमात मृत्यू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारातून जमीन लिहून दिल्याच्या पार्श्वभूमीवर मृतदेह ताब्यात घेण्यावरून वाद निर्माण झाला. पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत काढली. त्यामुळे हा वाद तूर्तास शांत झाला.

बोबडे यांनी गावातील एका व्यक्तीकडून काही रक्कम घेतली होती. या आर्थिक व्यवहाराच्या बदल्यात त्यांनी संबंधित व्यक्तीच्या नावे जमीन लिहून दिल्याचे समजताच बोबडे यांचा मुलगा अनिल व अन्य नातेवाईकांनी मृतदेह घरी न नेता संबंधित सावकाराच्या घरासमोर नेऊन ठेवला. यामुळे खळबळ उडाली. आर्थिक व्यवहार आणि जमिनीच्या हस्तांतरणावरून निर्माण झालेल्या या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी हस्तक्षेप केला.

दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर नातेवाईकांनी पोपट बोबडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे खासगी सावकारी आणि आर्थिक व्यवहारांच्या बदल्यात जमिनीच्या हस्तांतरणाचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बोबडे यांच्या मृत्यूची नेमकी पार्श्वभूमी काय? आर्थिक व्यवहार कोणत्या अटींवर झाला होता? जमीन हस्तांतरण कायदेशीररीत्या झाले होते का? तसेच या प्रकरणात खासगी सावकारीसंदर्भात काही तक्रार दाखल झाली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT