सातारा : विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे, शाळेत त्यांची उपस्थिती वाढवणे आणि शिक्षणामध्ये समानता आणण्यासाठी केंद्र शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. मात्र सातारा जिल्ह्यात त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. शाळा, विद्यालयांना शालेय पोषण आहार विभागातील अधिकारी व कर्मचार्यांकडून मलिद्याची फर्माईश होत आहे. स्टेशनरी साहित्य, जेवण व पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहारात अधिकारी व कर्मचार्यांचेच पोषण होत आहे. यानिमित्ताने शालेय पोषणचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची गळती थांबवण्याच्या उद्देशाने शालेय पोषण आहार ही योजना सुरु करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली ही योजना नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेत वारंवार बदल होत गेले. घरी तांदूळ देण्यापासून ते शाळेत भोजन देण्यापर्यंतचे बदल झाले. आता ही योजना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेमार्फत पहिली ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला गेला. याची नोंद एमडीएम पोर्टलवर रोजच्या रोज केली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना तांदूळ व अन्य साहित्य पुरवले जात आहे. शिक्षकही दर आठवड्याला भाजीपाला आणून रोजच्या रोज विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात आहे.
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना रोजच्या रोज शालेय पोषण आहार दिला जातो का नाही याची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील पोषण आहार विभागाचे अधिक्षक व कर्मचारी वारंवार भेटी देत असतात. मात्र किचनशेडसह आलेल्या सर्व साहित्याची पाहणी करुन वेळप्रसंगी पोषण आहाराची चवही चाखत असतात. मात्र अनेकदा हे अधिक्षक काही तरी त्रुटी काढून शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना त्रास देत असल्याचे प्रकार सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात पहावयास मिळत आहेत. शाळेतील शेरे पुस्तकावर भेटीच्या नोंदी होतात. या अधिकार्याकडून शेराही दिला जातो.
मात्र काहीवेळा जाणीवपूर्वक अधिकारी चुकीचा शेरा देत आहेत. तर काही वेळा हे अधिकारी शेरा देण्यासही टाळाटाळ करुन केंद्रप्रमुखांच्या अधिपत्याखाली विविध साहित्यांची मागणी मुख्याध्यापक व शिक्षकांकडे करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण होण्याऐवजी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांचेच पोषण होवू लागले असून खरा लाभार्थी विद्यार्थी मात्र कुपोषितच राहिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे अधिकारी महाशय अनेकदा शैक्षणिक साहित्य तसेच काही रकमेची मागणी करत आहेत. हे अधिकारी भेटीच्या निमित्ताने शाळेत आले असता त्यांची फर्माईशप्रमाणे सरबराई करण्याचा फंडाच सध्या सुरु आहे. शालेय पोषण आहाराची चव चाखण्याऐवजी ते मिष्टान्न भोजन खाण्यासाठीच येतात की काय असा सवाल पालकांना पडला आहे. शिक्षकांना इच्छा नसताना त्यांची मर्जी राखण्यासाठी नाहक खर्च करावा लागत आहे.