सातारा : ‘मदतीने आमचा जय खंडागळे हा चिमुरडा परत येणार नाही; बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा,’ अशी आर्त आणि संतप्त मागणी करत न्हाळेवाडी, मालगावसह परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेसवर धाव घेतली.
सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या जय खंडागळे या चिमुरड्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस प्रशासनही तातडीने जलमंदिर पॅलेसवर दाखल झाले.
संतप्त ग्रामस्थांनी थेट खा. उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी बिबट्याच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी लावून धरली. ‘आर्थिक मदत देऊन आमचा मुलगा परत येणार नाही. भविष्यात दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक...
दरम्यान, या गंभीर घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोमवार दि. ५ रोजी जिल्हाधिकारी संतोष पाटील व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक होणार आहे. बिबट्याचा वावर, नागरिकांची सुरक्षितता आणि पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त आणि नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना यावर निर्णय घेतला जाणार आहे.
कुटुंबियांना १० लाखाची मदत
दरम्यान, या गंभीर घटनेनंतर ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खा. उदयनराजे यांच्या उपस्थितीत मृत बालकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उर्वरित १५ लाख रुपयांची मदत महिनाभरात शासकीय नियमानुसार मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याबाबत वारंवार वनविभागाला माहिती देऊनही वेळीच प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित वनअधिकाऱ्याची चौकशी करुन दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रसार माध्यमाशी बोलताना करण्यात आली आहे.
‘कुत्री खाणाऱ्या बिबट्याला आता माणसाचे रक्त लागले आहे. आम्ही वारंवार वनविभागाला माहिती देऊनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. अखेर एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला. या घटनेची जबाबदारी निश्चित करुन संबंधित वनअधिकाऱ्यावर कारवाई करावी,’ अशी संतप्त मागणी ग्रामस्थ सदाशिव बागल यांनी केली. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने गस्त वाढवणे, बिबट्याचा माग काढणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित होते.
मात्र, तक्रारी करुनही अपेक्षित कार्यवाही झाली नाही. चिमुकल्याच्या मृत्यूने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा. आमच्या संरक्षणासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. बिबट्यापासून बचावासाठी आम्हाला शस्त्र चालवण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी केली. मात्र, वन्यजीवांपासून संरक्षणासाठी नागरिकांनी स्वतःहून शस्त्र वापरण्याऐवजी प्रशासनाने कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी केली.