सातारा: साताऱ्यातील माची पेठेतील चिकन दुकानात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शहर हादरवून सोडणारा भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयावह होता की, चिकन दुकानासह मृत मुजमीन हमीद लगतच्या सव्र्व्हिसिंग सेंटरच्याही पालकर ठिकऱ्या उडाल्या. इमारतींची तावदाने, लगत उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या.
आपटी बार हा फटाका बनवताना ही दुर्घटना घडल्याचे समोर येत असून मुजमीन हमीद पालकर (वय ४२, रा. गुरुवार परज, सातारा) हे या दुर्घटनेत जागीच ठार झाले. यामध्ये आणखी दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आयबी, एटीएससह वविध तपास एजन्सी साताऱ्यात दाखल झाल्या आहेत. पान २ वर
मुजमीन पालकर यांनी फटाक्यांची सुमारे ६० किलो दारू आणली होती. ती घरीच ठेवली होती; मात्र कुटुंबाने ती दारू घरी ठेवण्यास मज्जाव केला. यामुळे बुधवारी रिक्षातून ती फटाक्यांची दारू माची पेठेतील चिकन दुकानात आणली. दुपारी मुजमीन हे दुकान बंद करून आपटी बार बनवत होते. यादरम्यानच स्फोट झाला आणि ६० किलो फटाक्यांच्या दारूच्या स्फोटात ते २५ फूट उंच हवेत उडाले. त्यांच्या शरीराचे छिन्नविच्छिन्न तुकडे होऊन परिसरात पडले.
हरूण शब्बीर बागवान (वय ४८) व त्यांचा मुलगा उमर हारुन बागवान (वय २५, दोघे रा. शनिवार पेठ) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण माची पेठेतीलच मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी जात असताना स्फोटात जखमी झाले आहेत. साताऱ्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून हरुण बागवान हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माची पेठेलगत काळा दगड हा परिसर आहे. कास रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत चिकन सेंटरचे दुकान असून त्या पाठीमागे लागूनच वाहनांचे सर्व्हिसींग सेंटर आहे. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे दोन्ही दुकानांमध्ये नियमित कामे सुरु होती. सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बाहेरुन बंद दिसत असलेल्या चिकन सेंटर दुकानामध्ये भीषण स्फोट झाला. कानठळ्या बसणाऱ्या या आवाजाने परिसरातील एकाच्या घराची भिंत कोसळली तर बहुतेक घरांच्या काचा फुटल्या. हा स्फोट एवढा भीषण होता की चिकन दुकानातील मुजमीन पालकर हे हवेत २५ फूट उडून मुख्य रस्त्यावर पडले. या स्फोटामध्ये त्यांच्या शरीराचे छिन्नविच्छिन्न तुकडे झाले. तर रस्त्यावरच रक्ताचा सडा पडला होता.
स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण सातारा शहर हादरून गेले. भीषण स्फोटानंतर परिसरात असे धुराचे लोट दिसत होते. पहिली १० मिनिटे नेमके काय झाले आहे? कानातील पडदा आहे की फाटला? अशी भीती वाटली, डोळ्यांदेखत काही जणांनी स्फोट पाहिल्यामुळे ते हादरुन गेले. घटनेच्या दिशेने सुरुवातीला कोणाचेच जाण्याचे धाडस झाले नाही. चिकन दुकान संपूर्ण उद्ध्वस्त होवून त्या दुकानाचे पत्रे, लाकडी बांबू सुमारे ५० मीटर अंतरावर उडून पडले होते. २०० मीटर परिसरातील बहुतांशी घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. यामुळे लहान मुले, महिला व वृध्द हेही घाबरुन गेले.
सुमारे १० मिनिटानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि पोलिसांना पाचारण केले. आवाजाच्या दिशेने परिसरासह संपूर्ण सातारा शहर लोटले. बघ्यांची गर्दी झाल्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्याची वेळ आली. नागरिकांना घटनास्थळी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. यानंतर फॉरेन्सिक पथक, बॉम्बशोधक पथक, ठसे तज्ञ, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. नेमका स्फोट कशाचा झाला? हा प्रश्न होता. कोणी म्हणत होते गॅस सिलेंडरची टाकी फुटली, कोणी म्हणत होते कॉम्प्रेसर फुटला तर कोणी म्हणत सीएनजीची टाकी फुटली. मात्र, नेमका कशाचा स्फोट झाला हे सायंकाळी पोलिसांच्या तपासात समोर आले.
मृत मुजमीन पालकर यांच्या कुटुंबियांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यानुसार मुजमीन हे चिकन विक्री सोबत सीझनल व्यवसाय करत होते. दिवाळीमध्ये आपटी बार ते विकायचे. मात्र, त्यामध्ये अधिक फायदा होत नसल्याने यावर्षी फटाका बनवण्यासाठी कच्चा माल आणला. या साहित्यात फटाक्याची दारु अधिक आणली होती. या फटाक्याच्या दारुचा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली. रात्री उशीरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.
स्फोट झालेल्या परिसरातील लोकांना तर स्फोट झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने विविध बाबींचे नमुने घेतले आहेत. सीलबंद वस्तू तपासाला घेतल्यानंतर त्या पुणे-मुंबईला तपासणीसाठी पाठवल्या जाणार आहेत. फटाक्यांच्या दारुचा स्फोट झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अधिकृतपणे स्फोट कशाचा झाले हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फटाक्यांची दारु कुठून आणली? ती कधी आणली होती? फटाके बनवण्यासाठी मुजमीन पालकर यांना नेमके ज्ञान काय होते? असे अनेक सवाल या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. पोलिस त्याबाबत अधिक माहिती घेत असून तपासामध्ये यासह अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा आहे.
माची पेठेत स्फोट झाल्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो, एटीएस, एसआयडी, सातारा शहर पोलिस, सातारा वाहतुक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १०० हून अधिक पोलिसांचा परिसराला वेढा पडला होता. क्युआरटी स्कॉडची तुकडी परिसरात तैनात करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर गुरुवार बाग व समर्थ मंदीर चौक येथून वाहतूक वळवण्यात आली.