Satara News: सातार्‍यात कोणता प्रभाग खुला; कोणता होणार आरक्षित? File Photo
सातारा

Satara News: सातार्‍यात कोणता प्रभाग खुला; कोणता होणार आरक्षित?

आज 50 नगरसेवकपदांसाठी सोडत : 25 प्रभागांमध्ये नवी समीकरणे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. सातार्‍यातील 25 प्रभागांतील 50 नगरसेवकपदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सर्वसाधारण, इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित होणार आहेत. या सोडत प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सातार्‍यातील सर्व प्रभागांमध्ये नव्याने राजकीय समीकरणे अस्तित्वात येणार आहेत. कोणता प्रभाग खुला राहणार आणि कोणता प्रभाग आरक्षित होणार, याकडे भावी नगरसेवकांसह सातारकरांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार शहरातील मतदार यादीची प्रक्रिया सुरु असून नागरिकांकडून येणार्‍या हरकती व सुचना स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादीनंतर थेट निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याने सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी तसेच इतर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत आधीच जाहीर झाली असून हे पद यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित राहणार आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि विविध स्थानिक आघाड्यांच्या गोटात चर्चा व रणनितीची व्यूहरचना सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातार्‍यातील 25 प्रभागांतील 50 नगरसेवकपदांची आरक्षण सोडत बुधवार दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता श्री. छत्रपती शाहू कला मंदिर येथे पार पडणार आहे. या सोडतीसाठी नगरसेवक पदाचे इच्छुक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. '

प्रत्येक प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, कोणता प्रभाग महिला प्रवर्गात जाणार, कोणता प्रभाग खुला राहणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्याने राजकीय समीकरणे पुन्हा मांडली जात आहेत. काही प्रभागांमध्ये जुने नगरसेवक आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्याची शक्यता आहे. आरक्षण सोयीचे पडेल की नाही याची धाकधूक वाढली आहे. त्यातच नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

राजकीय पातळीवर शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेले समीकरण, स्थानिक पातळीवर होणारी मोर्चेबांधणी व पारंपरिक दोन्ही आघाड्यांशिवाय तिसर्‍या आघाडीची शक्यता, आगामी प्रचार, उमेदवार निवड आणि प्रचार मोहिमा यांना वेग येणार आहे. प्रभाग आरक्षण सोडतीनंतरच सातार्‍याच्या राजकारणातील नव्या घडामोडी घडणार आहेत. कोणत्या आघाडीला कोणते प्रभाग अनुकूल होतात, कोणत्या प्रभागात बंडखोरीचे सावट दिसते यावरच निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे. नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सातारा पालिकेची निवडणूक ही राजघराण्यांतील प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT