सातारा

Satara News : लग्‍न सोहळ्यात जेवणातून वऱ्हाडाला विषबाधा, सातारा जिल्‍ह्यातील मल्हारपेठ येथील घटना

७० जणांना बाधा झाल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

मारूल हवेली : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ (जि. सातारा) येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यातील जेवणानंतर अनेक नागरिकांना अचानक उलटी, जुलाब व अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत सुमारे ६० ते ७० नागरिकांना विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यापैकी ४३ जणांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विवाह सोहळ्यातील भोजन घेतल्यानंतर काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. बाधितांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांवर तातडीने प्राथमिक उपचार केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर बहुतांश रुग्णांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, काही बाधितांनी परिसरातील खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे समोर आले असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन विवाह सोहळ्यातील जेवणाचे विविध पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे मल्हारपेठ परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच अन्‍नातून विषबाधा झाली की, अन्य कोणत्या कारणामुळे नागरिक आजारी पडले, याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT