कण्हेर : सातारच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार असलेल्या मोळाचा ओढा चौकातच भर रस्त्यात भला मोठा खड्डा पडल्याने पाण्याचा डोह निर्माण झाला आहे. येथील खड्ड्यांमुळे ये-जा करणार्या विद्यार्थी व प्रवासी व वाहनचालकांचे अक्षरश: पेकाट मोडले आहे. त्यांचे हाल होत असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने तेथील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
मान्सूनच्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून डबकी निर्माण झाली आहेत. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता’ अशी अवस्था असल्याने येथील रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. या चौकात एक फूट व अर्ध्या फुटाचे खोल खड्डे आहेत. त्यामुळे वाहने आपटली जात आहेत. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या चौकातच खड्ड्यातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा डोह निर्माण झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी डोळेझाक होत असल्याने तेथील वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मोळाचा ओढा चौकात मोठी बाजारपेठ असल्याने येथे नेहमीच वाहतुकीची रहदारी असते. या चौकातूनच शहराकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने येथे अनेक वाहनांची वर्दळ असते. मात्र खड्ड्यात पाण्याची तळी, वाहतूक कोंडी यामुळे हे प्रवेशद्वारच समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. येथील चौकात येताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने ठिकठिकाणी डबकी तयार झाली आहेत. रात्रीच्या वेळी अपघात होऊन काही दुचाकी वाहनचालक जायबंदी झाले आहेत. वाहन चालवताना खड्डा दिसला तर अचानक ब्रेक लावला जातो. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील खड्ड्यांची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून, रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. या चौकातील रस्त्याकडेला ठिकठिकाणी कचर्याचे ढीग लागले आहेत. नजीकच असणार्या आयटीआयमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांच्या व तेथील रहिवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच या कचर्यावर मोकाट जनावरे व कुत्री ताव मारत असल्याने कचरा सर्वत्र पसरून दुर्गंधी निर्माण झाली आहे.
मोळाचा ओढा परिसरात असणार्या खड्ड्यांतील गढूळ पाण्यामुळे रस्त्यावर राडारोडा झाला आहे. या खड्ड्यांतून वाहने दामटवत वाहनचालक जात असल्याने त्यांचे पेकाट मोडत आहे. दिवसेंदिवस येथील खड्डे आणखी मोठे होत असल्याचे वास्तव आहे. चौकातील अवजड वाहने व पावसाने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे मुजवून पाण्याचा निचरा करण्याची मागणी संबंधित रहिवाशांमधून केली जात आहे.