खेड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला सातारा- कोरेगाव मार्गावरील कृष्णानगर येथे गळती लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तर रस्त्यावरील पाण्यामुळे वाहने घसरत असून छोटे-मोठे अपघात होत आहेत.
सातारा शहराच्या उपनगरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संगममाहुली येथील कृष्णा नदीतील योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा नदीतून पंपिंग करून पाणी विसावा जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. शुद्ध केलेल्या पाण्याचे वितरण पुढील टप्प्यात केले जाते. सातारा - कोरेगाव मार्गावरील कृष्णानगर येथील रस्त्याच्या दुभाजकानजीक मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर दलदल व शेवाळ निर्माण झाले आहे. त्यातून दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तर सातत्याने छोटे-रमोठे अपघात होत आहेत.
रस्त्याच्याकडेला राहुट्या टाकून बसलेल्या फुलझाडे विक्रेत्यांनी चर काढून वाहणार्या फुकटच्या पाण्याचा वापर फुलझाडांसाठी सुरू केला आहे. तर वेगाने येणार्या चारचाकी वाहनांमुळे रस्त्यावरून चालणार्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहेे. येथील गळती काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडे तक्रार केली; परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. गळतीद्वारे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून प्राधिकरणाने गळती काढून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.