विठ्ठल हेंद्रे
सातारा : सातारा पोलिस दलाच्या वृंदावन पोलिस वसाहतीमध्ये सर्व कुटुंबांना दरमहा कमीतकमी १५०० रुपये व त्याहून अधिक वीज बिल येत आहे. याशिवाय आता वीज बिलासाठी अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ६६० भरण्याच्या सूचना एमएसईबी दिल्याने पोलिस डबल भुर्दंड सोसत आहेत. वसाहतीचे गृहमंत्र्यांनी उद्घाटन करुन घरं दिली पण वीज बिलाने दमवलं अशी परिस्थिती पोलिसांची झाली आहे. या स्मार्ट मीटरला आता सर्वसामान्यांसह पोलिसही वैतागले आहेत.
पोलिसांच्या वृंदावन पोलिस वसाहतीचे काम ८ वर्षे चालले होते. यामुळे सातार्यात पोलिसांवर राहण्याची आबाळ झाली होती. दै.'पुढारी'ने याबाबत लेखाजोखा मांडला होता. अखेर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वी दिमाखात वसाहतीचे उद्घाटन झाले. सातार्यात पोलिसांची ही वसाहत म्हणजे भव्यदिव्य असा प्रोजेक्ट आहे.
या प्रकल्पात ६७५ फ्लॅट असून ३५ अधिकार्यांची निवासस्थाने आहेत. आता मात्र पोलिस वसाहतीमधील त्रुटी समोर येवू लागल्या आहेत. वीज बिलावरुन पोलिस हैराण झाले आहेत. कमीतकमी १५०० रुपये वीज बिलाचा फंडा सहा महिने झाले तरी पोलिसांना समजू शकले नाही. अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी केल्या तरीही नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता सुरक्षा ठेव या नावाखाली ६०० रुपये भरण्यास सांगितले जात आहे. वास्तविक ही रक्कम मासिक वीज बिलाचा भाग नसून सुरक्षा ठेव म्हणून कायमस्वरूपी महावितरणकडे जमा राहणार आहे.