सागर गुजर
सातारा : पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सह्याद्री देवराई संस्थेच्यावतीने सातारा तालुक्यातील आंबवडे येथे अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या 'वृक्षांच्या अनाथाश्रमात' तब्बल १५० जुन्या आणि दुर्मिळ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विविध कारणांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, बांधकाम प्रकल्प तसेच औद्योगिक विकासामुळे अनेक वर्षे वाढलेली मोठी झाडे तोडली जातात किंवा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. अशा झाडांना वाचवून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून पुनर्रोपण करण्याची संकल्पना सह्याद्री देवराईने प्रत्यक्षात आणली आहे. आंबवडे येथे विकसित करण्यात आलेल्या या 'वृक्ष अनाथाश्रमात' विविध प्रजातींच्या सुमारे १५० वृक्षांना नव्याने जीवन देण्यात आले आहे. तसेच ४०० झाडांना जीवदान देण्याचा संकल्प सह्याद्री देवराईतर्फे करण्यात आला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबवडेत ही चळवळ सुरु झाली. आंबवडेच्या ग्रामपंचायतीने देखील यासाठी पुढाकार घेतला.
या उपक्रमासाठी विशेष यंत्रसामग्रीच्या साहाय्याने झाडे मुळांसह उपटून त्यांचे अत्यंत काळजीपूर्वक स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर योग्य माती, पाणी आणि आवश्यक निगा राखून झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे जुनी असलेली झाडे पुन्हा जोमाने वाढू लागली आहेत.