सातारा

Satara News: वाढेफाटा परिसरात वाहतुकीचे कोंडाळे

रस्त्यावर होतेय पार्किंग : अवजड वाहनांवर निर्बंध गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा- लोणंद मार्गावरील वाढेफाटा परिसरात दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. महामार्ग परिसरात सेवा रस्त्यासह लोणंद-सातारा रोड जाम होत आहे. मार्गावरील वेण्णा नदीवरील पुलावरील रस्ता अरुंद असून परिसरातील दुकानांमध्ये थांबणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने लावत आहेत. रस्त्यावरील पार्किंग तसेच अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण महामार्गावर येत आहे. वाढे फाटा परिसरातील वाहतुकीचे कोंडाळे सोडवण्यासाठी अवजड वाहतुकीवर निर्बंध लावावेत, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

वाढेफाटा हे सातारा शहरात येण्यासाठीचे प्रवेशव्दार आहे. त्यामुळेच सातारा- लोणंद मार्गावर वाहनांची सतत वर्दळ राहते. तसेच ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी सातारा शहरात येत आहेत. त्यातच आता ऊस गाळप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे सातारा- लोणंद मार्गावर वाहतूक वाढली आहे.

आधीच वाढे फाटा ते वाढे गावापर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यातच या परिसरात उड्डाण पूल ते वेण्णा नदी यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल व इतर व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असून त्यांच्यासाठी अपवाद वगळता पार्किंग व्यवस्थाच नाही. त्यामुळे ही सर्व वाहने रस्त्यावरच उभी असतात. तसेच टोल वाचवण्यासाठी बहुतांश राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक सातारा- लोणंद मार्गावरुन होते. वाढेफाटा ते पाटखळमाथा या दरम्यानचा रस्ता अरुंद असून त्या तुलनेत वाहनांची वर्दळ अधिक आहे.

परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मार्गावरील वाहतूक विस्कळीत होवून वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीचा ताण महामार्गावर येत असून वाढेफाटा चौक जाम होत आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागतात. शालेय विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला मोठा फटका बसत आहे. महामार्गावरुन सातारा शहरात वळणारी वाहतूकदेखील ठप्प होत आहे. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यावर स्थानिकांचे देखील दळणवळण ठप्प होत आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असल्याने ऊस वाहतूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा- लोणंद मार्गावरील अवजड वाहतुकीवर निर्बंध लावावेत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT