Pudhari Photo
सातारा

Satara News: आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके नियुक्त

जिल्हाधिकारी संतोष पाटील : नगरपालिका-नगरपंचायतीसाठी 437 मतदान केंद्रे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, वाई, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नऊ नगरपालिका आणि मेढा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात 3 लाख 86 हजार 455 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 91 हजार 464 पुरुष मतदार तर 1 लाख 94 हजार 732 तर इतर 59 मतदार असून, 437 इतकी मतदान केंद्रे आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार, असा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी नगरपालिका प्रशासन सहआयुक्त अभिजित बापट उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

उमेदवारांना नामनिर्देशनपत्र https://mahasecelec.in या वेबसाईटवर भरण्यासाठी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. हे नामनिर्देशपत्र 17 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशपत्राची छाननी 18 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येणार असून त्यानंतर वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येणार आहे. या प्रक्रियेबाबत आक्षेप असेल किंवा अपिल केले असेल तर 25 रोजीपर्यंत संबंधितास माघार घेता येईल. 26 नोव्हेंबरला चिन्हवाटप करण्यात येणार असून त्यानंतर लगेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी 3 लाख 86 हजार 455 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 91 हजार 464 पुरूष मतदार तर 1 लाख 94 हजार 732 तर इतर 59 मतदार आहेत. निवडणूक जाहीर झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये 437 इतकी मतदान केंद्रे आहेत.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, राखीव जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यान मात्र जात प्रमाणपत्र समितीकडील अर्ज सादर केल्याची पावती आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर उमेदवाराने सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर मतदारांना मतदान केंद्र, प्रभाग आदिंची माहिती मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो.

मात्र या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. 1 जुलै 2025 हा दिनांक अधिसूचित करण्यात आला असून त्यापूर्वीच्या मतदारांची नावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीत असणे अपेक्षित आहे. नावे नव्याने समाविष्ट करणे किंवा नावे डिलिट करता येणार नाहीत. दुबार नावांच्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. दुबार नावांसमोर डबल स्टार करण्यात आला आहे. संबंधित मतदार कुठल्या प्रभागात मतदान करणार आहेत, याची माहिती घेतली जाणार असून एकाच ठिकाणी संबंधितांचे मतदान होईल, याची काळजी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी घेणार आहेत. मतदान यंत्रांवरच मतदान घेण्यात येणार असून व्हीव्हीपॅट हे यंत्र या निवडणुकीत वापरले जाणार नाही. उमेदवार संख्येमुळे विधानसभा, लोकसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकांचे स्वरूप वेगळे असल्यामुळे मतदान यंत्रे ही वेगळी असतात. 437 मतदान केंद्रे असल्यामुळे मतदान यंत्रांमध्ये 532 कंट्रोल युनिट व 1 हजार 74 बॅलेट युनिट उपलब्ध करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

उमेदवारांना निवडणुकीत किती खर्च करता येईल?

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. सातारा नगरपालकेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी 15 लाख तर नगरसेवकपदासाठी 5 लाख, कराड व फलटण नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी 11 लाख 25 हजार तर नगरसेवकपदासाठी 3 लाख 50 हजार, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 7 लाख 50 हजार रूपये तर नगरसेवकपदासाठी 2 लाख 50 हजार खर्च मर्यादा आहे. मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी 6 लाख तर नगरसेवकपदासाठी 2 लाख 25 हजार इतकी खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT