वेलंग : वाई शहर व तालुक्यात उस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलींचा वापर केला जातो. मात्र हे ट्रॅक्टर चालक वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता रस्त्याच्या कडेला अथवा मधोमध वाहन उभे करतात. त्यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी पोलिसांनी जनजागृती करावी प्रसंगी ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली आहे.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे वाई तालुक्यात अनेक ठिकाणी बैलगाडी, ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रकमधून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू आहे. किसनवीर व लगतच्या प्रतापगड कारखान्याला तालुक्यातून ऊस जात आहे. मात्र, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलींना लावलेले रिफ्लेक्टर अतिशय लहान व फिके असल्याने ते लांबून दिसत नाहीत. मोठे व स्पष्ट रिफ्लेक्टर न लावल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण होतो.
अनेक नागरिकांनी या निष्काळजी ट्रॅक्टरचालक व मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे तसेच काही ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालवताना मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर किंवा स्पीकरवर गाणी वाजवत असतात. त्यामुळे पाठिमागून येणाऱ्या वाहनचालकांची अडचण होते. यातूनच अपघातही होत आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत उपाययोजना कराव्या. ट्रॅक्टरची तपासणी करावी, चालकांना सूचना करावी अशी मागणी होत आहे.