सुरेश सूर्यवंशी
उंब्रज : भोळेवाडी ता. कराड या गावाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींना तसेच उंब्रज येथे बाजारहाट करण्यासाठी जाणार्या महिला, जेष्ठ नागरिक यांना दररोज मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
गावातून एसटीची सुविधा नसल्यामुळे सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना चरेगांव येथे हायस्कूलला जाण्यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळी चार किलो मीटरची पायपीट करावी लागत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहनमंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी भोळेवाडी गावासाठी तातडीने एसटीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सातारा व कराड आगार व्यवस्थापक यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी भोळेवाडी ग्रामस्थ, पालक व विद्याथ्यार्ंनी केली आहे.
भोळेवाडी हे कराड दक्षिणमधील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. गावाला रस्त्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. स्व. पी. डी. पाटील यांच्या प्रयत्नातून सन २००१ मध्ये नाबार्डमधून म्होप्रे ते भोळेवाडी फाटा असा सुमारे चार किलोमीटर अंतरावरील रस्ता डांबरीकरणासह पूर्ण झाला. मात्र गेल्या पंचवीस वर्षात गावाला एसटी सुरू होवू शकली नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. यापूर्वी एक ते दोन वेळा उंब्रज पाटण व्हाया भोळेवाडी अशी एसटी सुरू झाली. मात्र एसटी चालक व वाहक यांच्या उदासीनतेमुळे अवघ्या सात ते आठ दिवसांत एसटी बंद झाली.
भोळेवाडी येथे पहिली ते चौथी अशी प्राथमिक शाळा असून, पाचवी ते दहावीसाठी चार किलोमीटर अंतरावरील चरेगांव हायस्कूल येथे तर त्यापुढील शिक्षणासाठी उंब्रज, कराड, सातारा याठिकाणी विद्यार्थ्यांना जावे लागते. एसटीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी पायी प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. अनेकदा मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळा गाठणेही कठीण होते. यामध्ये विशेषतः मुलींची मोठी गैरसोय होत आहे. सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा चार किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे. त्यातच सद्यस्थितीत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने पालकांमध्ये सतत चिंतेचे वातावरण असते. काही विद्यार्थ्यांना या अडचणीमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत.
तसेच पाटण-पंढरपूर हा राज्य मार्ग असल्याने मुलांच्या सुरक्षेसाठी सायकलचा पर्याय सुद्धा धोकादायक ठरत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यासर्व समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत भोळेवाडी, ग्रामस्थ तसेच चरेगाव हायस्कूल प्रशासनाने अनेक वेळा एसटी महामंडळाचे कराड, पाटण, सातारा येथील संबंधित अधिकारी, आगारप्रमुख तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे लेखी निवेदने देऊन आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती दिली. उंब्रज ते पाटण आणि पाटण उंब्रज व्हाया भोळेवाडी अशी एसटीची नियमित फेरी सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देत या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन सातारा जिल्हा आगारप्रमुख व कराड आगार प्रमुख यांना भोळेवाडी गावासाठी नियमित एसटी बससेवा सुरू करण्याबाबत त्वरित निर्देश द्यावेत अशी मागणी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी केली आहे.