मलकापूर : येथील प्रभाग क्रमांक सहामधील समस्या खूपच गंभीर आहेत. पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहत येणारे पाणी येथील अनेक कॉलनींमध्ये घुसते. त्यामुळे कॉलन्या जलमय होतात. याच प्रभागात नगरपालिकेचा करचा डेपो आहे. कचरा पेटवला जातो. त्यामुळे प्रदूषण होते. या गंभीर समस्यांवर नगरपालिकेने अद्याप तरी उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
प्रभाग क्रमांक सहामधील लोकसंख्या 2885 आहे. या प्रभागात दत्त मंदिर परिसर, बागलवस्ती गल्ली क्र. 1 ते 4, आनंद बंगलो स्कीम, माळीनगर,जयमल्हार कॉलनी, दत्तशिवम हौसिंग सोसायटी, मातणे किराण स्टोअर्स परिसर, न्यू सर्वोदय कॉलनी, अयोध्यानगरी व उत्तर बाजूचा परिसर येतो. बहुतेक कॉलन्या या आगाशिवर डोंगराला लागून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येला तेथील नागरिकांना तोंड द्यावे लागते.
पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहते. डोंगरातून येणारे पाण्याचे लोट दत्त, शिवम् कॉलनीत येतात. हे पाणी अनेकांच्या घरात घुसते. या प्रभागात जय मल्हार कॉलनीत कचरा प्लांट असल्याने अनेकदा कचरा पेटवला जातो. ही आग चार -चार दिवस पेटत राहते. धुपत राहते. त्यामुळे धुराचे लोटच्या लोट सर्वत्र पसरतात. नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. हा कचरा डेपो येथून अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा केली आहे. पण अद्याप नगरपालिकेकडून दखल घेतली गेलेली नाही.
सर्वोदय कॅलनी परिसरात ड्रेनेजचे पाणी निचरा करण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे नाले तुंबतात. दुर्गंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. प्रभागात काही रस्ते वगळता अन्य रस्ते, पाणी व स्ट्रीट लाईट व्यवस्था चांगली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. या प्रभागात काही कॉलन्यामध्ये चांगले रस्ते झाले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते खराब आहेत. त्यांची डागडुजी करावी अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले करण्यात यावेत.या प्रभागात खेळाचे मैदान असावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
प्रभागामध्ये सर्वच पक्षाच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या प्रभागात बंडखोरी अटळ आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस सर्वच पक्षांनी या ठिकाणी कंबर कसली आहे. तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका काहींनी बोलून दाखवली आहे. इच्छकांना उमेदवारी नाकारली तर नाराज गट पक्षाचे व दिलेल्या उमेदवाराचे काम करणार का हा प्रश्न आहे. नाराज एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोट बांधण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
इच्छुकांची संख्या अधिक
या निवडणुकीत इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजप तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उबाठा शिवसेना या प्रत्येक पक्षाचे गट प्रबल आहेत. या प्रभागात आबा सोळवंडे, बाळासाहेब सातपुते, विलास चव्हाण, मुकुंद माने, सतिश शिंदे ,भारत जंत्रे, प्रकाश बागल, जयंत कुराडे, राहुल यादव, सुरज शेवाळे,पंकज शेवाळे, दिलीप जाधव,मंगेश जाधव इच्छुक आहेत. या शिवाय अपक्ष लढण्याची तयारी काहींनी सुरू केली आहे.