सुरुर ते पोलादपूर रस्त्याची झालेली दुरवस्था. 
सातारा

Satara News : सुरुर-पोलादपूर रस्त्यात गैरव्यवहारासह संस्थात्मक खून

संदीप शिंदे यांचा आरोप : उपठेकेदाराने ३४ कोटींची दलाली लाटली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सुरुर - वाई - पाचगणी- महाबळेश्‍वर - पोलादपूर असा ३२६ कोटी रुपयांचा रस्ता असला तरी या रस्त्याच्या उपठेकेदाराने ३४ कोटींची दलाली लाटली आहे. हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून तो अधिकृत प्रशासकीय पाठबळावर केलेला संस्थात्मक खून आहे, अशा शब्दांत रयत राज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे.

सुरुर -पाचगणी- महाबळेश्वर- आणि पोलादपूरला जोडणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून संथ आणि निकृष्ट गतीने सुरू आहे. यामुळे सध्या हा घाट रस्ता काही ठिकाणी उखडला आहे. आणि अनेक ठिकाणी खड्डे व अपूर्ण कामे आहेत. एक महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांना प्राण गमवावे लागले. दिल्ली पासिंगची एक कारही या घाटात कोसळली होती. या दिल्ली पासिंगच्या अपघाताची माहिती समोर आलेली आहे. दुर्दैवाने याबाबतची माहिती सातारा व रायगड पोलीस प्रशासनाला नाही. याचा अर्थ आंबेनळी घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामावर होणाऱ्या अपघाताबाबत शासन गंभीर नाही, असेही शिंदे म्‍हणाले.

हैदराबाद येथील एका कंपनीने स्थानिक उपठेकेदार नेमला असून या ठेकेदाराला कुठल्याही प्रकारची दया नसून निधी लाटण्याचा त्याला आनंद वाटत आहे. मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार भयानक आहे. या महत्वकांक्षी रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी ज्या बांधकाम विभागाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यामध्ये या दयानंद भोसले नावाच्या उपठेकेदाराला कोण पाठीशी घालत आहे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

हा रस्ता जेवढा जाणीवपूर्वक रखडवला तेवढ्या प्रमाणात निधी वाढ होण्याची अपेक्षा ठेवूनच हे काम संथगतीने होत आहे. मूळ कामाची निविदाही २८९ कोटींची असून त्यामध्ये १७.११ टक्के वाढ केलेली आहे. या कामाबाबत कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे आठवड्याला दोन अपघात होत आहेत. मूळ काम घेणारी कंपनी प्री इन्फ्रा हे केवळ जीएसटी नंबरचा वापर करून उप ठेकेदार याच्यावर चांगलीच दया केलेली आहे. वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी तेवढ्यात दर्जेदार कंपनीची आवश्यकता असते. परंतु, या ठिकाणी फक्त पैसा कमवा... पैसा जिरवा.. अशीच योजना झाली आहे का? असाही सवाल शिंदे यांनी केला.

शिंदे पुढे म्‍हणाले, संबंधित उपठेकेदार बदलीचे रॅकेट चालवत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी चित्रीकरण केले जाते. त्या आधारे ब्लॅकमेलिंग केले आहे. या उपठेकेदाराच्या संपत्तीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून त्यांनी स्थापन केलेल्या १३ कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केलेली आहे.

एक महिन्यापूर्वी म्हणजे दि. २४ मे २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील आठ निष्पाप तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. त्याला एक महिना पूर्ण होऊन सुद्धा संबंधित उपठेकेदाराच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. त्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली अटक करावी. एसआयटी पथकाच्या मार्फत त्याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. या रस्त्याचे कोर टेस्टिंग आणि क्यूब टेस्टिंग करून उप ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केलेली आहे. परंतु उपठेकेदाराला तुरुंगवास होत नाही तोपर्यंत रयत राज संघटना लढा थांबवणार नाही असाही इशारा संदीप शिंदे यांनी दिला. यावेळी संदीप देशमुख, शिवाजी चोरट संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT