कराड : क्विक हील सायबर वॉरियर क्लब शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड आणि सैदापूर ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या सायबर शिक्षित गाव - सायबर गुन्ह्यांपासून दूर, आपले सैदापूर या विशेष उपक्रमाचे आयोजन सैदापूर ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या सर्व सायबर जनजागृती उपक्रमांचा अहवाल ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व अधिकार्यांसमोर सादर करण्यात आला. त्यानंतर सैदापूर सायबर शिक्षित गाव म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
या अभियानातून १०,०३१ नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती पोहोचविण्यात आली. या अभियानांतर्गत सैदापूरमधील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, स्थानिक गट आणि नागरिकांशी संवाद साधून सायबर फसवणूक, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, पासवर्ड सुरक्षा, सोशल मीडिया सुरक्षा, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि मोबाईलमधील आवश्यक सुरक्षा सेटिंग्ज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्पिरीट मीटरिंग टेक्नॉलॉजी कंपनीचे फाऊंडर व फ्लो अँड एनर्जी मेसरमेंट विषयातील तज्ज्ञ तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जॉन शेन यांच्या हस्ते सैदापूरला सायबर शिक्षित गाव म्हणून घोषित करून समन्वयक डॉ. प्रियांका शिंदे व क्लब विद्यार्थी पदाधिकारी यांना आभार पत्र प्रदान करण्यात आले.
माजी सरपंच जाधव यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी क्विक हिल फाऊंडेशनच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर, अजय शिर्के, गायत्री केसकर, दिपू सिंग, कार्तिकी व संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले. प्राचार्य डॉ. संजीव वाघ, डॉ. एस. के. पाटील, बी. एस. पाटील, यू. एल. देशपांडे, के. एन. अलसुंदकर तसेच महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्यांचे सहकार्य लाभले.