सातारा

Satara News : नुकसान भरपाईतून भात पिकाला वगळले?

पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट; भात उत्पादक शेतकरी मदतीपासून राहणार वंचित

पुढारी वृत्तसेवा

चाफळ : पाटण तालुक्याकडे गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील उभी पिके करपून वाळू लागली आहेत. तालुक्यात शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असतानाही चाफळसह डोंगराळ भागातील भात उत्पादक शेतकर्‍यांसमोर मात्र नव्या संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून नुकसान भरपाईसाठी सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड मका आदी पिकांचा विचार केला जाणार असल्याची चर्चा असून, भात पिकाचा समावेश न झाल्यास या भागातील हजारो भात उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

चाफळ विभाग हा डोंगराळ व पावसावर अवलंबून असलेला भाग असून, येथील शेतकर्‍यांचे खरीप हंगामातील प्रमुख पीक भात आहे. अनेक शेतकरी वर्षानुवर्षे भात शेतीवरच आपला उदरनिर्वाह करीत आहेत. पावसाच्या पाण्यावरच भाताची लागवड केली जाते. सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या अपेक्षेने भाताची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी भाताची रोपे पिवळी पडली असून, पिकांची वाढ खुंटली आहे. काही शेतांमध्ये भाताचे पीक वाळण्याच्या अवस्थेत पोहोचले आहे. पाऊस पुन्हा झाला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी केलेला बियाणे, खत, औषधे, मशागत व मजुरीचा खर्चही वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भात हे या भागातील प्रमुख खरीप पीक असल्याने केवळ काही निवडक पिकांच्या नुकसानीचा विचार करून मदत देणे योग्य ठरणार नाही. पावसाअभावी भात पिकाचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहावे आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

उत्पादन घटण्याची भीती

पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना बसत आहे. भात पिकाला वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची गरज असते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक शेतांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

आधीच शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, मजुरीचे वाढलेले दर आणि शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत शासनाची नुकसानभरपाईच शेतकर्‍यांना मोठा आधार ठरणार आहे.

भात उत्पादकांमध्ये अस्वस्थता...

दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये भात पिकाचा समावेश न झाल्यास चाफळ विभागातील भात उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड आदी पिकांचे नुकसान विचारात घेतले जात असेल, तर त्याचप्रमाणे भात पिकाचेही प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन पंचनामे करणे आवश्यक आहे.

सर्व पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

शासनाने दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून चाफळसह पाटण तालुक्यातील सर्व बाधित गावांमध्ये तातडीने पिकांचे पंचनामे करावेत. पंचनामे करताना सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड मका यांच्यासोबतच भात पिकाचाही प्राधान्याने समावेश करावा. प्रत्यक्ष शेतातील नुकसानीच्या प्रमाणावर नुकसानभरपाई निश्चित करून भात उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT