शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यावर दै. ’पुढारी’ने ‘अस्वस्थ एमआयडीसी’ या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रसिध्द केल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच गुन्हेगारी रोखणे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रादेशिक अधिकार्यांनीही पुढाकार घेतला आहे. खंडणी मागणे, बदनामी करणे, ठेका घेण्यासाठी जबरदस्ती करणार्यांविरोधा तक्रारी करण्याचे आवाहन पोनि यशवंत नलावडे यांनी केले आहे.
शिरवळ, केसुर्डी व धनगरवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढू लागल्याने दै.‘पुढारी’ने याची ‘अस्वस्थ एमआयडीसी’ या वृत्तमालिकेतून पोलखोल केली आहे. यावर अखेर पोलिस यंत्रणा व एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी गुन्हेगारीवर ठोस पावले उचलल्यानंतर रोजगारासाठीही प्रादेशिक अधिकार्यांनी तोडगा काढणे गरजेचे आहे. येथील औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारीची समस्या,परप्रांतीयांना रोजगार,स्थानिक नेत्यांची कंपनीमध्ये राजकीय ढवळाढवळ यावर उपाययोजना व्हाव्या, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
विविध कारणांवरून अनेक कंपन्यांमध्ये खंडणी मागण्याचे प्रकार होत आहेत. मात्र, या प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत नसल्याने पोलिसांना तपास करता येत नाही. कंपनीची होणारी बदनामी अथवा खंडणी यावर समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. कंपनी व्यवस्थापनाने खंडणीविरोधात तक्रारी कराव्या.यशवंत नलावडे पोलिस निरीक्षक, शिरवळ
खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. औद्योगिक परिक्षेत्रात वाढलेले खंडणी तसेच गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. कंपन्यांमध्ये रोजगारात स्थानिकांचा टक्का वाढवण्यासंदर्भात कंपन्यांना सूचना केल्या जातील.डॉ. अमितकुमार सोंडग, प्रादेशिक अधिकारी, सातारा
भूमिपुत्रांना नोकरीमध्ये कायस्वरूपी करण्यासाठी कोणतीही कंपनी प्रयत्न करत नाही. सर्व कंपन्या कॉन्ट्रॅक्ट पद्धत वापरून भूमिपुत्रांना कॉन्ट्रॅक्टमध्ये काम देतात व त्यांचे वय झाल्यानंतर पुढे त्यांना आयुष्यात कुठेही परमनंट जॉब मिळत नाही. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन खंडाळा तालुक्यातील भूमिपुत्रांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकर्यांची जमीन कंपनीला दिली अशांच्या मुलांना नोकरीत कायमस्वरूपी करावे.ईश्वर जोशी, शिरवळ