कोरेगाव : कोरेगाव पोलिसांच्या राजकीय व एकतर्फी भूमिकेविरोधात आसरे, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरपंच सौ. सविता सणस व सदस्य रुपेश सपकाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी पक्षपात करून पीडितांवरच गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोनि घनश्याम बल्लाळ यांची बदली करावी, या मागणीसाठी आसरे ग्रामस्थांनी कोरेगाव पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
आसरे येथे गटार बांधकामाच्या कामावरून समाजकंटकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर हल्ला केला. या प्रकरणात मूळ संशयितांना अटक न करता त्यांना पाठीशी घालण्याचे काम पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
हल्ल्याला अनेक दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसून, आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याउलट जखमी रुपेश सपकाळ, सरपंच सविता सणस व त्यांच्या कुटुंबीयांवर चोरीसारखे खोटे गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळेच पोनि बल्लाळ यांची बदली करावी, या मागणीसाठी आसरे ग्रामस्थांनी आंदोलन केले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते साहिल शिंदे, राजाभाऊ जगदाळे, प्रतिभा बर्गे, रामचंद्र सणस यांच्यासह मान्यवरांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दर्शवला. जोपर्यंत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व पोलिस निरीक्षकांची बदली केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.