तारळे : दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तारळे विभागात पावसाच्या दमदार सरींची पुन्हा कोसळधार सुरू झाली आहे. यामुळे मान्सून तोंडावर येऊन ठेपला असताना पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला खीळ बसली आहे.
काही ठिकाणी नांगरट नाही, नांगरट झालेल्या रानात मशागत नाही, उकिरड्यात शेणखत अजून पडून असल्याने तिहेरी अस्मानी संकटात शेतकरी सापडला आहे. तारळे विभागात डोंगर पट्ट्यात भाताचे भरघोस उत्पन्न घेतले जाते. त्यासाठी लागणारी तरवे लवकर पेरली जातात. तीही कामे रखडल्याने पाऊस कधी उघडतो, याकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत.
बहुतांशी तारळे विभाग डोंगर दर्यांत विखुरला आहे. यामुळे शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून केला जातो. या विभागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असते. डोंगर परिसरात भात, नाचणी व भुईमूग ही प्रमुख पिके घेतली जातात. तर डोंगराखालील भागात हायब्रीड, सोयाबीन, भुईमूग, भात व इतर कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. मुबलक चारा उपलब्ध होत असल्याने शेती बरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. यामुळे पशुपालन शेतीला पूरक व्यवसाय शेतकर्यांना किफायतशीर ठरत आहे. शेतातून जनावराना चारा मिळत असतो. पण यंदा पावसामुळे पेरणीपूर्व मशागतींची कमीच रखडून पडली आहेत.
गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. सरासरी जून अखेर जमिनीला उपळे फुटले जातात. पण, यंदा पावसाची सुरुवात धुवाँधार झाल्याने मेअखेर होण्यापूर्वीच जमिनीला उपळे फुटले आहेत. गेल्या कित्येक वर्षांनंतर अशी घटना घडल्याचे जानकारांचे मत आहे. एप्रिल महिन्यात नांगरटीची कामे उरकली जातात. त्यानंतर मे महिन्यामध्ये नांगरट झालेल्या रानात शेणखत पसरले जाते. दरम्यानच्या काळात एक दोन वळीव ढासळल्यानंतर जुनच्या सुरुवातीला पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात केली जाते. पण यंदा मात्र चित्र उलटेच दिसत आहे. काही ठिकाणी अजून नांगरटीची कामे रखडली आहेत.
मे महिन्याच्या मध्यावर पावसाने सुरुवात केली. दोन तीन दिवस पडल्यानंतर पाऊस विश्रांती घेईल व त्यानंतर रानातील इतर कामे उरकून घेऊ असा शेतकर्यांचा अंदाज होता. पण जुनचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने अजून विश्रांती घेतली नाही. यामुळे फनपाळी मारणे, सड-काशा गोळा करणे, खत पसरणे अशी पेरणीपूर्व मशागतींची कामे रखडून पडली आहेत. गेल्या आठवड्यात दिवसापूर्वी दोन तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यादरम्यान घात येणार्या माळरानात रोटर, फनपाळी मारण्यात आली. पण, बहुतांशी रानातील जमिनीत ओलावा असल्याने मशागतींना अडचणी येत आहेत.
डोंगर परिसरासह सखल भागात मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. त्यासाठी मे महिन्याच्या मध्यावर बैलाच्या सहाय्याने रानांची नांगरट करून भाताची तरवे टाकण्यासाठी रान तयार केले जाते. पण त्याच दरम्यान सुरु झालेल्या पावसाने उघडीप न दिल्याने नांगरटीसह तरवे टाकण्याची कामेही खोळंबून पडली आहेत. डोंगरी भागासह सखल भागातील शेतकरीही यामुळे मेटकुटीला आला असून पाऊस उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे.