सातारा

Satara News: पोलिसांकडून पालिका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

वेण्णालेक नाक्यावरील प्रकार : माफीनाम्यानंतर वाद निवळला

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वरमधील वेण्णालेक प्रवासी व प्रदूषण कर नाक्यावर शुक्रवारी सायंकाळी वाहतूक कोंडी सोडवण्यावरुन पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी वाहतूक पोलिसांकडून पालिका कर्मचारी इरफान खारकंडे यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन केल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. अखेर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने दिलगिरी व्यक्त करून माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला.

उन्हाळी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात असताना तसेच ‘वीकएंड’ सुट्ट्यांमुळे शुक्रवारी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वेण्णा लेक प्रवासी व प्रदूषण कर नाक्यापासून तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी कर नाक्यावरील चारपैकी दोन वाहतूक मार्ग सुरू ठेवून दोन मार्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. मात्र, वाहतूक कोंडीत अडकलेल्या मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दूरध्वनीवरून सर्व चार मार्ग सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा चारही लेन सुरू केल्या.

यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला. यावेळी पालिका कर्मचारी इरफान खारकंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई केल्याचे सांगितले. यावरून शाब्दिक वाद निर्माण झाला. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी केला. घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी संतप्त होत काही काळ काम बंद केले. त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक तसेच पालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, महेश गुजर यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप करत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. काही काळ दोन्ही बाजूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासमोरच चर्चा सुरू होती. अखेर नगराध्यक्ष सुनील शिंदे, पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक अफझल सुतार, संतोष शिंदे, रोहित ढेबे, मुख्य लिपिक बबन जाधव व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. चर्चेनंतर संबंधित वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने गैरसमजातून प्रकार घडल्याचे सांगत पालिका कर्मचाऱ्यांची माफी मागितली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरण मिटविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT