फलटण पोलिसांचा कारभार रामभरोसे Pudhari File Photo
सातारा

Satara News : फलटण पोलिसांचा कारभार रामभरोसे

तक्रारदार बेहाल, दलाल मालामाल : ‌‘लक्ष्मी दर्शन‌’ शिवाय न्याय मिळत नसल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पोपट मिंड

फलटण : फलटण शहर तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून गुन्हे नोंदवण्यात टाळाटाळ, गंभीर तक्रारींना किरकोळ स्वरूप देणे तसेच एन.सी. दाखल करून प्रकरणे थंडबस्त्यात ठेवली जात असल्याची चर्चा शहरासह तालुक्यात रंगू लागली आहे.

प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांची संख्या आणि अधिकृत गुन्हे नोंदी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ‌‘लक्ष्मी दर्शन‌’ शिवाय न्याय मिळत नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

शहर व तालुक्यात मारहाण, फसवणूक, धमक्या, आर्थिक व्यवहारातील वाद, महिलांवरील अत्याचार, हप्तेवसुली तसेच हॉटेल-ढाब्यांवरील बेकायदेशीर दारूविक्रीसारख्या घटना वाढत असतानाही अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्हा (एन.सी.) दाखल करून संबंधितांना वारंवार पोलिस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे. काही तक्रारदारांनी ‌‘तक्रार घेतली जाते; मात्र पुढील कारवाई होत नाही,‌’ अशी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिस ठाण्याच्या परिसरात तथाकथित मध्यस्थ अथवा दलाल सक्रिय झाल्याची चर्चा असून ‌‘प्रकरण मिटवून देतो‌’, ‌‘गुन्हा कमी करुन देतो‌’, ‌‘समेट घडवून आणतो‌’ अशा आश्वासनांद्वारे आर्थिक व्यवहार होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. काही जण तक्रारदार आणि आरोपी अशा दोन्ही बाजूंशी संपर्क ठेवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. ‌‘गुन्हा दाखल करायचा असेल तर वेगळी भाषा आणि गुन्हा टाळायचा असेल तर वेगळी भाषा,‌’ अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत असून त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही गंभीर तक्रारींना किरकोळ वादाचे स्वरुप देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला जात आहे.

पोलिस दलातील काही कनिष्ठ अधिकारी ‌‘वरुन आदेश‌’ या कारणाखालीच काम करत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. परिणामी, न्यायासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या सामान्य नागरिकांना प्रक्रिया, प्रतीक्षा आणि मानसिक त्रासालाच सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहर व तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना अधिकृत गुन्हेगारी आकडेवारी आणि वास्तव यात फरक का दिसतो? गुन्हे नोंदणी कमी ठेवून क्राईम रेट नियंत्रणात दाखवण्याचा प्रयत्न होत आहे का? ‌‘लक्ष्मी दर्शन‌’ झाल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, अशी चर्चा का रंगते? पोलिस ठाण्यातील कथित दलालीला अभय कोणाचे? असे अनेक प्रश्न आता नागरिक उघडपणे उपस्थित करू लागले आहेत. फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी करून संबंधित तक्रारींची पडताळणी करावी आणि जनतेचा पोलिस प्रशासनावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT